Friday, April 26, 2024
Homeनगरनगर: न्यायालय, ‘सेंट विवेकानंद’, ‘साईदीप’, ‘व्ही स्टार’ स्वच्छतेत प्रथम

नगर: न्यायालय, ‘सेंट विवेकानंद’, ‘साईदीप’, ‘व्ही स्टार’ स्वच्छतेत प्रथम

महापालिकेतर्फे पुरस्कार वितरण : 12 संस्था व 32 कर्मचार्‍यांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील शासकीय आस्थापने, शाळा, रुग्णालये आणि हॉटेलच्या सर्वेक्षणात सर्वाधिक स्वच्छ असलेल्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जिल्हा न्यायालय, सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल, साईदीप हॉस्पिटल आणि व्ही. स्टार हॉटेल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी उत्कृष्ठ काम करणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांचाही गौरव करण्यात आला.

- Advertisement -

अहमदनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता विषय उपाययोजनांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती व प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता पुरस्कारांचे वितरण महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा दिला.

यावेळी द्विवेदी की, स्वच्छ सर्वेक्षणात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. ‘अब की बार, थ्री स्टार’ हा नारा व संकल्प महापालिकेने केला आहे. यात नगरकरांचा व नगरसेवकांचाही सहभाग आवश्यकच आहे. स्वच्छतेबाबत कुणीही तडजोड करू नये. स्वच्छता ही केवळ मनपाची जबाबदारी आहे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपले शहर स्वच्छ असणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याबाबत सकारात्मक मानसिकता नागरिकांमध्ये तयार होण्याची गरज आहे.

आज स्वच्छतेबाबत इंदौरचे उदाहरण दिले जाते. तेथे प्रत्येक नागरिक स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्याने बदल झाला आहे. शहरातील प्रत्येक नागरिक, नगरसेवकाने स्वच्छतेबाबत संकल्प करावा. महापालिकेने स्वच्छतेच्या लढाईत सहभाग घेतला आहे. लढाईत आपले सैनिक मजबूत असतील, तर विजयाची खात्री असते. त्यामुळे यात सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांवरच आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळालेत, त्यांनी अधिक जोमाने काम करावे. कदाचित पुन्हा त्यांना पुरस्कार मिळतील. ज्यांना मिळाले नाहीत, त्यांनी इतरांकडून प्रेरणा घेऊन पुरस्कार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत.

महापौर वाकळे म्हणाले, मागील वेळी सर्वेक्षणात आपल्याला सर्वात शेवटचा क्रमांक मिळाला होता. यावेळी आपण सुरुवातच चांगली केली आहे. स्वच्छतेत सुधारणा होणे, हे कुणा एकाचे काम नाही. मात्र, कर्मचार्‍यांना आपले कर्तव्य पार पाडावेच लागेल. कुणी काम करत नसतील तर त्यांना प्रोत्साहित करा, अन्यथा कारवाई अटळ आहे. आपले काम अशाच पद्धतीने चांगले राहिले तर दोन महिन्यांत ध्येय गाठू शकतो. सर्वांच्या सहकार्याने आपण ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त सुनील पवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. अनिल बोरगे यांनी केले. समन्वयक सुरेश खामकर यांनी स्वच्छतेची शपथ दिली. या स्पर्धेचे मूल्यमापन हरियाली या संस्थेने केले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, संदीप पावसे, प्रा. सतीश शिर्के यांनी प्रत्यक्ष ठीकाणी जाऊन मूल्यमापन करून विहीत अर्जानुसार गुणांकन केले. यामध्ये केंद्र शासनाच्या निकषांची (शौचालय, पाणी, दैनंदिन स्वच्छता, कचराकुंडी, खत प्रकल्प आदी) पडताळणी करून स्वच्छतेच्या आधारावर क्रमवारी निश्चित करण्यात आली.

पुरस्कार प्राप्त संस्था
शासकीय कार्यालये- जिल्हा न्यायालय (प्रथम), सार्वजनिक बांधकाम विभाग (द्वितीय), आकाशवाणी केंद्र (तृतीय). शाळा- सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल (प्रथम), भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल (द्वितीय), रेसिडेन्शियल हायस्कूल (तृतीय). रुग्णालये- साईदीप हॉस्पिटल (प्रथम), आनंदऋषिजी हॉस्पिटल (द्वितीय), स्वास्थ हॉस्पिटल (तृतीय). हॉटेल- व्ही स्टार (प्रथम), सुवर्णम प्राईड (द्वितीय), संकेत हॉटेल (तृतीय).

पुरस्कार प्राप्त सफाई कर्मचारी
सावेडी प्रभाग समिती- मुकुंद वैराळ, लीला भोसले, नंदा कागोरिया, इंदू खंदारे, प्रल्हाद काते, विजय वडागळे, सुभाष वाघमारे, उमा ठोकळ. माळीवाडा प्रभाग समिती- हेमंत चवालिया, सचिन लोखंडे, रवींद्र वैरागर, ललिता दिवटे, गणेश गाडे, मनेष खरारे, दत्तात्रय शिंदे, मंगल लोखंडे. झेंडीगेट प्रभाग समिती- देवराम ठोंबरे, पांडू गाडे, आनंद चावरे, बेबी कांबळे, विठ्ठल चांदणे, मनिष खरारे, अनिल डाके, भानुदास पवार. बुरुडगाव प्रभाग समिती- संतोष शिंदे, भामा बुलाखे, रत्नमाला नेटके, इंदू साठे, राजू मेढे, रंजना कांबळे, जनाबाई कांबळे, विजया गायकवाड.

- Advertisment -

ताज्या बातम्या