करुया जागर आत्मशक्तीचा

jalgaon-digital
6 Min Read

सु. ल. हिंगणे

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्तिस्वरूप दुर्गेची उपासना करतो. विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून देवीच्या उपासनेत लीन होतो. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मशक्ती असून, ती ओळखण्याचा हा कालखंड आहे.

आत्मशक्ती जागृत केल्यास आपल्याला चांगल्या संधी प्राप्त होतात. त्याचबरोबर आपल्या आतील आणि भोवताली असलेल्या दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीही आपण यामुळे प्रोत्साहित होतो.

दुर्गामातेला शक्तीचे आद्यपीठ मानले जाते आणि सर्व शक्तींचा स्रोतही. या शक्तिस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करणे हीच देवीची खरी उपासना आहे. या उपासनेसाठी नवरात्र ही सर्वांत मोठी सुसंधी आहे. नवरात्र म्हणजे देवीची आराधना करून आपली मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व. आपल्या आतील तामसी प्रवृत्तींचा त्याग करून सात्त्विक होण्याचा हा काळ आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उपासनेसंबंधी लिहिले आहे की,

कर्मणाए, मनसाए, वाचाए, सर्वावस्थास्सु सर्वदा। समीप सेवा विधीना उपास्तीरिती कथ्यये॥

आपल्या भावना निर्मळ, वाणी शुद्ध आणि कृत्ये पवित्र करून आत्मिक शक्तीची अपेक्षा घेऊन देवीसमोर संपूर्ण श्रद्धेनिशी स्वतःला सादर करणे हीच तपश्चर्या आहे. या उपासनेची आणि तपश्चर्येची गरज मनुष्याला का आहे, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. या जगात कोणतेही काम, मग ते छोटे असो वा मोठे, ते करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, हे आपण सर्वजण जाणतो. परंतु चांगले काम करण्यासाठी आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. आपल्या दिनचर्येत आपण अनेक कृती करतो. त्यातील काही चांगल्या असतात तर काहींंमध्ये उणिवा असतात. आपल्या मानसिक चेतनेमध्ये चांगल्या-वाईट अशा सर्व भावना एकत्र होत राहतात आणि तेथून जशी ऊर्जा आपल्याला मिळते, तसे काम आपण व्यवहारात करीत असतो. परंतु नवरात्राच्या पर्वात आपण उपवास आणि उपासना याद्वारे आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जेचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा संचय करीत असतो. त्यामुळे आपल्याला समस्यांशी लढण्यासाठी आत्मबळ, समजूतदारपणा आणि साहस या गोष्टी मिळतात.

जीवन सहजसोपे, सुलभ, सरळ, तणावमुक्त आणि आनंदी बनण्यासाठी दुःखांपासून मुक्ती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या दुःखाने ग्रासलेला असतोच. मग ते शारीरिक दुःख असो वा मानसिक. दुःखाचे प्रमुख कारण आहे, शक्तीहीनता. दुःखांशी लढण्यासाठी आंतरिक शक्तीच जर आपल्याकडे नसेल तर आपले जीवन सुखमय कसे होणार? मग दुःखांशी लढण्याची शक्ती आपल्याला कशी मिळेल? या प्रश्नाचे उत्तर आहे ‘साधना’. शक्तीच्या स्रोताची साधना केल्यानेच आपल्याला ही शक्ती प्राप्त होते. इंद्रियांवर नियंत्रण, क्रोधावर नियंत्रण आणि मनाच्या अश्वाला लगाम ही साधनाच शक्तीला आवाहन करणारी आहे. शक्तीचा संचय आपल्यात याच मार्गाने होऊ शकतो.

ही साधना सोपी नाही. त्यामुळेच नवरात्रात उपवासाचा मार्ग सांगण्यात आला आहे. त्यामुळे आपले चित्त शुद्ध होते आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळतो. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असून, शक्तिसंचयासाठी तो सर्वांत उपयुक्त आहे, असे मानले जाते. कारण आपल्या विचारांना दिशा देणारे तरंग या काळात सर्वाधिक सक्रिय असतात. आपण एकदा आपल्या आंतरिक शक्तीला ओळखले की आपल्या सर्व समस्यांचे निराकरण आपोआपच होऊन जाईल. आपल्याला दुःखातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग दिसू लागेल आणि जीवन आनंदी होईल.

आपल्या आतील सकारात्मक ऊर्जा आणि आपले आत्मबळ हेच सौंदर्याची निर्मिती करते. या ठिकाणी निर्मिती अर्थात सृजन या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. केवळ निर्माण करणे एवढ्यापुरता हा अर्थ मर्यादित नाही. एखाद्या व्यक्तीकडून एखादी सेवा, मदत किंवा त्या व्यक्तीशी चांगले आचरण या सर्व गोष्टी ‘सृजन’ या संज्ञेत अंतर्भूत असतात आणि या सर्वांत सौंदर्य वसलेले असते. व्यक्ती आपली उपजीविका चालविण्यासाठी जे कार्य करते, ते जर प्रामाणिकपणा आणि मन लावून केले, तर तेच त्या व्यक्तीच्या जीवनाचे सृजन आहे.

एखादी व्यक्ती जर रोपे लावण्याचे, पूल बनविण्याचे किंवा केवळ जमीन समतल करण्यासाठी माती खणण्याचे काम करीत असेल, तरी ते कार्य ती व्यक्ती आपल्या आतील ऊर्जेच्या आधारेच करते. तेच त्या व्यक्तीचे सृजन असते. जगात कोणताही स्वार्थ न ठेवता लोकांसाठीच केवळ काम करणारे कितीतरी लोक असतात. त्यांच्या अंतरंगात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असते. तीच त्यांना समाजसेवा करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि हे सर्व भक्तीच्या शक्तीद्वारेच शक्य होते. नवरात्रात आपण देवीच्या अशाच शुद्ध, संपूर्ण आणि सृजनशील स्वरूपाची भक्ती करतो. त्यामुळे तशीच ऊर्जा आपल्याही अंतरंगात प्रवाहित होते. ही ऊर्जा आपल्याला उपवास आणि उपासनेतून मिळते.

अनेकदा आपल्या आतील विकारांशी लढताना आपण कमकुवत आहोत, असे काही व्यक्तींना वाटते. सत्य-असत्य, पाप-पुण्य आणि भावनांच्या आवेगात चुकीचा निर्णय घेण्याचे भय अशा व्यक्तीला सतत छळत असते. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्या व्यक्तीला सापडत नसतो. या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा. ही ऊर्जा आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास तर शिकवतेच; शिवाय चांगल्या-वाईटात फरक करण्याची बुद्धीही प्रदान करते. जेव्हा एखादी व्यक्ती न्यायाच्या बाजूने उभी राहते, तेव्हा ती ईश्वराच्या बाजूने उभी राहिली आहे असाच त्याचा अर्थ होतो. दुर्गादेवीच्या हातातील त्रिशुळामुळे महिषासुराच्या छातीतून जे रक्त वाहताना दिसते, ते याच न्यायाचे प्रतीक आहे. अन्यायाच्या विरोधात देवीच्या डोळ्यांमध्ये संताप आहे. तोच आपल्याला न्यायाचे रक्षण आणि अन्यायाचा नायनाट करण्याची प्रेरणा देतो. व्यक्तिगत पातळीवर मिळणारी ही प्रेरणा जेव्हा समूहात परिवर्तित होते तेव्हा तीच सामाजिक शक्ती आणि जागरणाचे काम करते. अशा प्रकारे व्यक्ती आणि समाज या दोहोंसाठी दुर्गा पूजा आणि नवरात्रामधून अत्यंत सकारात्मक संदेश मिळतो. दुर्गामातेची उपासना म्हणजे केवळ मूर्तीची आराधना नव्हे, तर व्यक्तिगत, मानसिक आणि सामाजिक ऊर्जा प्राप्त करण्याची ती प्रक्रियाही असते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *