करोना महायुद्धामध्ये आघाडीवरील योद्धे : डॉक्टर्स

करोना महायुद्धामध्ये आघाडीवरील योद्धे : डॉक्टर्स

डॉ. प्रतिभा औंधकर, कार्यकारिणी सदस्य व वैद्यकीय अधिकारी, नाशिक रेड क्रॉस

आज युवा पिढीपासून ते शंभरीजवळ आलेल्या वयोवृद्धांनीदेखील कधी न अनुभवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीतून प्रत्येक जण जात आहे. मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत करोनाने प्रवेश केला आहे. डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वूहान शहरात सापडलेल्या संशयित रुग्णापासून करोनाचा प्रवास सुरू झाला आणि झपाट्याने त्याने अख्खे जग व्यापून टाकले.

विषाणूचे स्वरूप, त्यावरील उपचार, प्रतिबंध याविषयी काहीही माहिती नसताना मानवाने त्याच्याशी लढाई सुरू केली. या लढाईत सर्वात आघाडीवर होते ते जगभरातील डॉक्टर्स! रुग्णालयीन सेवक, फार्मसी, नर्सिंग, रुग्णवाहिका आदी सर्वांचे डॉक्टरांना सहाय्य होत असले तरी लढाईची रूपरेषा मात्र डॉक्टरांनाच ठरवायची होती. आज तिसर्‍या लाटेच्या भयाखाली सर्वजण वावरताना आता करोनारुग्ण झपाट्याने कमी होत आहेत.

मार्च 2019 मध्ये कोविडचा भारतात संसर्ग झाला. त्या काळात विशेषतः शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांनी आपल्या जीवाची बाजी लावून उपचार सुरु केले. एके काळी अशी स्थिती होती की, कुठल्याही परिसरात करोना रुग्ण सापडल्यावर 3 ते 5 किलोमीटरचा परिसर सील (प्रतिबंधित) केला जात असे. आज बहुतेक रुग्ण घरातच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.

या संक्रमणात डॉक्टरांनी अहोरात्र केलेले परिश्रम आणि इतरांनी त्यांना दिलेली साथ याचा सिंहाचा वाटा आहे. जसजसे कोविड विषाणूचे रूप उलगडत गेले तसतसे शासकीय निर्बंध सैल होत गेले. ठराविक निकष पूर्ण करणार्‍या खासगी रुग्णालयांना देखील करोना रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची परवानगी दिली गेली. त्यामुळे शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी तर झालाच; शिवाय रुग्णांना उपचार करून घेण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध झाले. काही मूठभर व्यक्तींनी या परिस्थितीचा गैरफायदा उठवून रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली, पण बहुतेक रुग्णालयांमध्ये शासकीय नियमानुसार उपचार केले गेले व त्यानुसार शुल्क घेतले गेले.

मध्यंतरी किमान दोनदा अशी स्थिती आली की, रुग्णसंख्येत प्रचंड वाढ आणि त्या मानाने उपलब्ध खाटा मात्र अतिशय कमी! अशावेळी औषधांचा काळाबाजार सुरू झाला. डॉक्टर जीवावर उदार होऊन उपचार करीत असताना रेमडेसिविरसारख्या औषधांच्या एका बाटलीतून अक्षरशः हजारो रुपये कमावण्यात आले. परंतु अशा घटनांमध्ये डॉक्टरांचा सहभाग नगण्य होता.

तरीही रुग्णास उपचारांमध्ये विलंब होणे किंवा काही दुर्दैवी प्रसंगांत रुग्णाचा मृत्यू होणे यात प्रत्यक्ष डॉक्टरांचा सहभाग खूप कमी असतानादेखील अनेक घटनांमध्ये डॉक्टरांना अमानुष मारहाण करण्यात आली. काही प्रसंगांमध्ये डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला. तासन तास पीपीई किट घालून कठीण अवस्थेत उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर सेवकवृंद पाहून या मंडळींबद्दल आदर वाढतो. आज करोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असले तरी आजतागायत या आजाराचा संसर्ग झालेले एकूण रुग्ण, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, प्रत्येक रुग्णावर झालेला मोठा खर्च, तसेच रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना झालेला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक धक्का, झालेले नुकसान भरून निघण्यास खूप वेळ लागणार आहे.

शासकीय यंत्रणांसमोरचे आव्हान तर मोठेच आहे. वैद्यकीय सेवेसाठी खर्चात होणारी प्रचंड वाढ आणि दुसरीकडे टाळेबंदीमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद पडले. कराच्या रूपात मिळणार्‍या उत्पन्नात लक्षणीय घट यामुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यातून मार्ग काढणे तर क्रमप्राप्तच आहे. सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरू करणे अजून शक्य झालेले नाही. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा वैद्यकीय क्षेत्रावर खिळल्या आहेत. कारण आता वैद्यकीय तज्ञच या अभूतपूर्व स्थितीतून मार्ग दाखवू शकणार आहेत.

करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींत सर्वात जास्त प्रमाण वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे आहे. या व्यक्तींबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी आज 1 जुलैस साजरा होणार्‍या ‘डॉक्टर्स दिना’सारखा दुसरा चांगला दिवस नाही. विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी ‘डॉक्टर्स डे’ साजरे केले जातात. याचे कारण त्या-त्या देशातील सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिलेल्या व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. भारतात ‘डॉक्टर दिन’ एक जुलैस साजरा होण्याचे कारणदेखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या दिवशी विख्यात समाजकारणी, निष्णात डॉक्टर आणि पराकोटीचा समन्वय साधणारे राजकारणी असा लौकिक असणारे डॉ. बिधानचंद्र अर्थात बी. सी. रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथीदेखील आहे.

सामान्य परिवारात जन्मलेल्या बिधानचंद्र यांनी आपल्या हुशारीने एमबीबीएस पदवी प्राप्त केली. इंग्लंडमध्ये एमआरसीपी हा अतिशय अवघड वैद्यकीय कोर्स केवळ सव्वादोन वर्षात एफआरसीएस या फेलोशिपसह यशस्वीरित्या पूर्ण केला. इंग्लंडमधील अनेक रुग्णालयांनी भरभक्कम मानधन देऊन डॉ. रॉय यांना इंग्लंडमध्येच वैद्यकीय सेवा देण्याची ऑफर दिली. परंतु मातृभूमीच्या ओढीने भारतात येऊन सर्वसामान्य गरजूंसाठी आपल्या वैद्यकीय कौशल्याचा वापर करण्यास डॉ. रॉय यांनी अग्रक्रम दिला. 1925 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारख्या दिग्गजाचा पराभव करून डॉ. रॉय आमदार बनले. महात्मा गांधींचे 1933 मधील प्रसिद्ध उपोषण थांबवण्यास भाग पाडून डॉक्टर रॉय यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटवला.

याचवर्षी कोलकात्याचे महापौर म्हणून पदग्रहण केल्यावर अल्पावधीत केलेल्या जनसुविधा आश्चर्यकारक होत्या. पुढे महात्मा गांधी यांच्या आग्रहाने 1948 साली त्यांनी बंगालचे मुख्यमंत्री पद स्वीकारले. 1962 पर्यंत बंगालचे नेतृत्व करून पश्चिम बंगालला सर्व स्तरांवर प्रगतीपथावर नेण्याचे श्रेय डॉक्टर बी. सी. रॉय यांना जाते. मुख्यमंत्री असतानाही दिवसातला ठराविक वेळ ते रुग्ण तपासणी साठी देत.

1961 साली ‘भारतरत्न’ या सर्वोच्च उपाधीने सन्मानित डॉ. रॉय यांनी त्यांच्या 80 व्या वाढदिवशी म्हणजे 1 जुलै 1962 रोजी ब्राह्मो गीत गाऊन जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतरही आपल्या मालकीच्या इमारती सामान्य जनतेच्या सेवार्थ रुग्णालयांसाठी दान करून एक नवीन आदर्श निर्माण केला. अशा थोर व्यक्तीच्या स्मृतिदिनी ‘डॉक्टर दिना’चे औचित्य मानवाबद्दल मोलाची कामगिरी बजावणार्‍या डॉक्टरांबद्दल ऋण व्यक्त व्हावे एवढीच माफक अपेक्षा! मग करा फोन आपल्या आवडत्या डॉक्टरांना आणि फक्त म्हणा ‘थँक यू’! प्रोत्साहन देणारे हे दोन शब्दच डॉक्टरांना पुढील काम आणखी जोमाने करण्याची ऊर्जा देत राहतील, हे नि:संशय!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com