Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरिलायन्सच्या कर्जमुक्तीची रंजक कहाणी

रिलायन्सच्या कर्जमुक्तीची रंजक कहाणी

काही वर्षांपूर्वी विलग झालेल्या अंबानी बंधूंपैकी अनिल यांच्यावर आज कर्जासाठी तोंड लपवत फिरण्याची वेळ आली आहे तर मुकेश यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखवलं आहे. अनेक अडचणी येऊनही अत्यंत चाणाक्षपणे खेळ्या करत त्यांनी आशियातली सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान तर मिळवलाच पण उद्योगविस्ताराचा तगडा पॅटर्न जगापुढे उभा केला आहे.

धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्सचं विश्व अक्षरशः शून्यातून उभं केलं. त्यांच्यानंतर त्यांच्या दोन मुलांनी रिलायन्स समूहाची वाटणी केली. अनिल अंबानी यांनी अनेक नवनवीन कंपन्या सुरू केल्या; परंतु त्या नीट चालवाव्या लागतात, जगाची गरज लक्षात घेऊन त्यात बदल करावे लागतात किंवा गुंतवणूक वाढवावी लागते, याचं भान त्यांना राहिलं नाही. वेगवेगळ्या वित्त संस्थांच्या कर्जाची फेड करता न आल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांना गजाआड जाण्यापासून मुकेश यांनीच एकदा वाचवलं; परंतु आता चीनच्या बँकांच्या न फेडलेल्या कर्जाचं शुक्लकाष्ट त्यांच्या मागे आहेच. या पार्श्वभूमीवर मुकेश यांची रिलायन्स इंडस्ट्रीज मात्र तिच्या घोषवाक्यानुसार जग मुठीत घ्यायला निघाली आहे. त्याचं कारण आहे त्यांनी व्यवस्थापनातल्या अधिकार्यांना दिलेली मोकळीक, त्यांच्यावर टाकलेला विश्वास आणि अधिकारीवर्ग आणि मुकेश यांची जगाची नाडी ओळखण्याची क्षमता. कोरोनाच्या संकटकाळात सारं जग गोंधळून गेलं आहे.

- Advertisement -

उद्योग जगतातून भीतीचं सावट जाता जात नाही आणि दुसरीकडे रिलायन्स मात्र पूर्वनियोजनानुसार कर्जमुक्त होते. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल; परंतु उद्योगजगतातच्या खाचाखोचा माहीत असलेल्यांना मुकेश यांची वाटचाल अजिबात आश्चर्याची वाटणार नाही. पैसा कुठे फिरतो आणि कसा फिरवला जाऊ शकतो, हे रिलायन्स इंडस्ट्रीनं गेल्या 58 दिवसांमध्ये दाखवून दिलं आहे.

रिलायन्स ही मूळ पेट्रोकेमिकल्स कंपनी. जगात पेट्रोलियम उत्पादनं, त्यासंबंधी रिलायन्सनं केलेले करार आणि त्यातून फार कमी साधलं जाईल असं वाटलं तेव्हा मुकेश आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगळ्या विश्वात अधिक लक्ष घातलं. याचा अर्थ त्यांनी ते क्षेत्र सोडलं असा नाही. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात आर्थिक चिंता व्यक्त केली जात असताना मुकेश यांनी काही महिन्यांपूर्वी जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतलं ढासळलेलं आपलं स्थान परत मिळवलंच; शिवाय त्यापुढेही मजल मारली. मुकेश यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचं महत्व ज्या हुशार गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं, त्यांची या इंडस्ट्रीतली गुंतवणूक गेल्या तीन महिन्यांमध्ये दुप्पट झाली. कोरोनामुळे बाजार पडला त्या दिवशी म्हणजे 23 मार्च रोजी रिलायन्सचा भाव 867 रुपये होता आणि शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा तो होता 1759 रुपये ! म्हणजे त्या वेळी गुंतवलेल्या पैशाचे तीन महिन्यांच्या आतच दुप्पट झाले.

रिलायन्स ही भारतातली सर्वात मोठी कंपनी असून तिचं बाजारमूल्य गेल्या शुक्रवारी 11 लाख 93 हजार कोटी रुपये (150 अब्ज डॉलर) झालं. भारतीय कंपनीचं बाजारमूल्य 11 लाख कोटी रुपये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 31 मार्च 2020 रोजी रिलायन्सवर एक लाख 61 हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्यामुळे गुंतवणूकदार रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यास घाबरत होते; पण गेल्या 58 दिवसांमध्ये या उद्योगानं अशी काही जादू केली की इतकं कर्ज असलेली कंपनी आज कर्जमुक्त झाली. त्याचं सर्व श्रेय अर्थातच रिलायन्स कंपनीनं पैसा कशात आहे, याचं भाकीत करून केलेल्या गुंतवणुकीला आहे.

आज आठवतो तो 11 ऑगस्ट 2019 हा दिवस. त्या दिवशी रिलायन्सची सर्वसाधारण सभा होती. त्यात मुकेश अंबानी यांनी एक वर्षात रिलायन्सला कर्जमुक्त करण्याचं जाहीर केलं. प्रत्यक्षात दहा महिन्यांमध्येच कंपनी तांत्रिकदृष्ट्या कर्जमुक्त झाली. त्यात मुकेश यांचा जसा वाटा आहे, तसाच त्यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा यांचाही आहे. प्रतिकूल परिस्थितीत ‘जिओ’मधल्या काही भागाचं निर्गुंतवणूक करण्याचा सल्ला आकाशचाच होता. त्याचं म्हणणं मुकेश यांनी मान्य केलं. त्यानुसार केलेली कार्यवाही किती योग्य होती, हे आता सर्वांना पटलं आहे.

अनिल आणि मुकेश यांच्या मिळकतीमध्ये काही दिवसांपूर्वी अवघ्या आठ हजार आठशे कोटी रुपयांचा फरक होता; परंतु आता या दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. खरं तर अनिल अंबानी यांनी अगोदर मोबाईलच्या क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यांचे ग्राहक आणि सेवाही चांगली होती; परंतु नंतर त्यांचं त्याकडे दुर्लक्ष झालं. ग्राहक कमी होत गेले. बाजारातल्या मोबाईल सेवा देणार्या अनेक कंपन्या अडचणीत आल्या. आयडिया, व्होडाफोन, एअरटेलसारख्या थोड्याच कंपन्या टिकून राहिल्या. ही परिस्थिती ओळखून मुकेश यांनी देशात फोर जी सेवा देणारी टेलिकॉम कंपनी अर्थात रिलायन्स जिओ सुरु केली. या कंपनीनं अन्य टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली. आज जिओचे 30 कोटींहून जास्त ग्राहक आहेत.

आता मुकेश अंबानी लवकरच देशातला सर्वात मोठा रिटेल ई कॉमर्स प्लेटफॉर्म घेऊन येणार आहेत. मुकेश यांची ‘नेट वर्थ’ 3.54 लाख कोटी रुपये आहे तर अनिल अंबानी यांची ‘नेट वर्थ’ 9500 कोटी रुपये आहे. मुकेश यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आता एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 150 अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्यानं मार्केट कॅपमध्येही वाढ होत आहे. अलिकडेच मुंबई शेअर बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार मूल्य 28 हजार 248.97 कोटी रुपयांनी वाढून 11 लाख 43 हजार 667 कोटी (150 अब्ज डॉलर्स) रुपये झालं. त्यापूर्वी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचं उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केल्याचं जाहीर केलं.

कर्जमुक्तीसाठीची प्रत्यक्ष निधी उभारणी अवघ्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका कंपनीनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली. ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. आत्तापर्यंत रिलायन्स जिओच्या 24.70 टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीने 1.6 लाख कोटी रुपयांची रक्कम जमवली आहे.

देशातला सर्वात श्रीमंत माणूस आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आता आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ‘फोर्ब्स’ मासिकाच्या रियल टाईम व्हिलनर्सच्या यादीत मुकेश यांनी चीनच्या हुई यान यांना मागे टाकलं असून त्यांची एकूण मालमत्ता 42.1 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे दोन लाख 73 हजार 650 कोटी रुपये झाली आहे. त्यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा सध्या व्यवसाय पुढे नेण्याचं काम हुशारीने करत आहेत. रिलायन्स टेलिकॉम आणि रिटेलची जबाबदारी ईशाची आहे.

ईशा सध्या रिलायन्स जिओची जबाबदारी सांभाळत आहे. ती रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांमध्ये संचालक आहेत. रिलायन्समध्ये येण्यापूर्वी तिनं अमेरिकेत ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म मॅककिन्सेमध्ये काम केलं आहे. आकाश अंबानी हे रिलायन्स जिओचे प्रोजेक्ट हेड-डायरेक्टर आहेत. ते रिलायन्स रिटेल बोर्डाचे सदस्य आहेत. मुकेश यांनी केलेली रिलायन्सच्या कर्जमुक्तीची घोषणा ही केवळ घोषणाच नव्हती तर त्यामागे एक सबळ कारणही होतं. आखाती देशातली सौदी आरामको नावाची तेल कंपनी रिलायन्सच्या एकूण भागभांडवलापैकी 20 टक्के शेअर घेणार हे निश्चित झालं होतं. आरामकोचे 75 अब्ज डॉलर येणार या बातमीनं शेअर बाजारात आनंदाचं उधाण आलं होतं. डिसेंबर 2019 मध्ये भारत सरकारनं हा सौदा मंजूर नसल्याचं कळवत थेट न्यायालयात धाव घेतली. रिलायन्सला कर्ज फेडण्यासाठी बाहेरून भागीदार आणण्याची गरज नाही, असं सरकारनं न्यायालयात सांगितलं.

याच दरम्यान अंबानी कुटुंबीयांपैकी काही सदस्यांनी प्राप्तिकराची चोरी केली, अशा संशयावरून प्राप्तिकर खात्याने त्यांची तपासणी सुरू केली. हा संशय अगदी बिनबुडाचा नव्हता. एचएसबीसी बँकेच्या स्वित्झर्लंड शाखेत 700 भारतीय नागरिकांची खाती सापडली. या खात्यांचा अंबानींशी संबंध होता. ही सर्व माहिती फ्रान्स सरकारनं भारत सरकारला पुरवली होती. भारतात तोपर्यंत आपल्या अर्थसंकल्पाची वेळ झाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात प्युअर टेरेप्थॅलीक ऍसिड (पीटीए)वर असलेले कर कमी करून सर्वांना समान संधी देण्याची घोषणा केली आणि रिलायन्सला आणखी एक धक्का दिला. प्युअर टेरेप्थॅलीक ऍसीड (पीटीए) या रसायनावरील रिलायन्सचा एकाधिकार सरकारने जवळ जवळ संपुष्टात आणला. हे रसायन कृत्रिम धागे बनवण्याकामी वापरलं जातं. पीटीएच्या मोनोपॉलीसाठी धीरुभाई अंबानी यांनी आपली हयात खर्च केली होती.

इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट पद्धतीनं गुंतवणूक करणार्यांना लाभांशांवर प्राप्तिकर आकारण्याची पद्धत बदलण्यात आल्यामुळे रिलायन्सनं मांडलेलं सर्वच गणित चुकलं. त्यातच कच्च्या तेलाचे भाव कोसळले. सौदी आरामकोचे सगळे मनसुबेही त्यासोबत कोसळले. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाला. आता सगळं काही संपलं असं जेव्हा वाटतं, तेव्हा अंबानी प्रतिकूल स्थितीतून वेगळी दिशा देतात. सौदी ऍरामकोच्या 20 टक्के गुंतवणुकीत खीळ पडते आहे, हे लक्षात आल्यावर रिलायन्सनं असेट म्हणून जिओचा वापर करायचा निर्णय घेतला.

रिलायन्सच्या हिशेबपत्रकात जिओमुळे झालेलं कर्ज फार मोठं आहे. कर्ज कमी करण्यासाठी रिलायन्सनं अगोदर हाथवे कंपनी ताब्यात घेतली. ‘न्यूज 18’मध्ये परदेशी गुंतवणूक आणली. त्यानंतर रिलायन्स जिओचे भाग 11 गुंतवणूकदारांना विकले. त्यासाठी फेसबुक आणि गुगल हे दोनच मोठे पर्याय होते; पण गुगल ऍमेझॉनसोबत आणि अलीबाबा पेटीएमसोबत जाईल हे चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं.साहजिकच जिओसाठी फेसबुक हेच उत्तम स्थळ होतं.

फेसबुकच्या बाजूनं नजर टाकली तर आजच्या तारखेला त्यांच्या हातात व्हॉटस् अपचे 40 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. बाजारात खर्च करू शकेल, अशी भारतातली कमावती पिढी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे फेसबुकनं फक्त ‘जिओ’च्या 9.9 टक्के भागीदारीसाठी 43 हजार 574 कोटी रुपये (5.7 बिलियन डॉलर) मोजले.

फेसबुकच्या आधीच रिलायन्समध्ये सिल्व्हर लेक या कंपनीनं पाच हजार 656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर ‘व्हिस्टा’ या कंपनीने 11 हजार 367 कोटी गुंतवण्याचं जाहीर केलं. असं एक लाख कोटींहून अधिक भांडवल जिओमध्ये जमा झालं. परकीय गुंतवणूकदारांमुळे देशी गुंतवणूकदारांनीही मग आयपीओ खरेदीत रस दाखवला आणि मग आजची कर्जमुक्तीची पहाट उगवली. मुकेश अंबानी यांनी अत्यंत धोरणी रहात मुत्सद्देगिरी दाखवत हुशारीने स्वत:ला कर्जमुक्त केलं आहे. गुंतवणूकदारच नव्हे तर आर्थिक व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनीही या परिस्थितीकडे एक लक्षवेधी धडा म्हणून पहायला हरकत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या