अलविदा सुरमा भोपाली

विनोदवीर जगदीप यांचे निधन
जगदीप
जगदीप

- डॉ अरुण स्वादी

ज्यांना दिलखुलास हसायला आवडत नाही, अशा कंजूस आणि खडूस प्राणिमात्रांना खळखळून हसवणारा विनोदवीर सैय्यद इशतियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानिमित्त जगदीप यांच्या कारकिर्दीच्या आठवणी जागवून श्रद्धांजली वाहणारा हा लेख.

ज्यांना दिलखुलास हसायला आवडत नाही, अशा कंजूस आणि खडूस प्राणिमात्रांना खळखळून हसवणारा विनोदवीर सैय्यद इशतियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.

एक बालकलाकार, मग मुख्य अभिनेता बनलेला जगदीप, काहीशा अपयशानंतर, कात टाकून विनोदी नट बनला आणि मोजून सात दशकं पडदा गाजवत राहिला. प्रथम जॉनी वोकर आणि मग मेहमूद यांची सद्दी असतानाही आपलं स्वतःचं स्थान निर्माण करून लोकांना हसवत राहिला. त्याच्या पैगंबरवासी होण्याने हिंदी चित्रपटसृष्टी एका हास्य उत्पादन करणार्‍या बड्या कारखानदाराला मुकली आहे.

जगदीप जगाला माहीत आहे तो विनोदी नट म्हणून, पण तो फिल्म लाईनमध्ये आला बाल कलाकार म्हणून! त्याचा पहिला सिनेमा बी. आर चोपडांचा ‘अफसाना’! त्यात मुलांच्या नाटकात दाढी चिटकवून त्याने दरवानाची भूमिका केली होती म्हणे. त्यावेळी चार वाक्यांचे त्याला तीन रुपये मिळाले होते. इट वोज गुड बार्गेन दॅट टाइम..., पण निर्मात्यांनी त्याच्यातला स्पार्क ओळखला.

अगदी बिमल रॉयनीही त्याला ‘दो बिघा जमीन’मध्ये बूट पॉलिश करणार्‍या मुलाची विनोदी भूमिका दिली.लौकिकार्थाने जगदीपची ही पहिली विनोदी भूमिका! त्याने बाल कलाकार म्हणून मुन्ना, पापी, रेल्वे प्लॅटफॉर्म, आरकेचा ‘अब दिल्ली दूर नहीं’ अशा चित्रपटात काम करीत आपला ठसा उमटवला. ‘हम पंछि एक डालके’मुळे तर त्याला पंडित नेहरुजींबरोबर ब्रेकफास्ट करायची संधी मिळाली. शिवाय त्यांनी भेट म्हणून त्याला वेताची छडी दिली. काही ठिकाणी स्कार्फ दिला, असा उल्लेख आहे. महत्वाचे एकच; नेहरुजींनी भेट दिली आणि ती जगदीपला प्राणप्रिय होती.

पौगंडावस्थेत असतांनाच एव्हीएम या बड्या बॅनरने त्याला करारबद्ध केलं. त्यावेळी सातशे रुपये पगार आणि राहायला जागा हे आमिष मोठे होते, पण त्यामुळे जगदीपला नंतर दुसर्‍या बॅनरखाली काम करता येईना. ही कदाचित मोठी घोडचूक असावी. एक योगायोग पाहा! जगदीप आईला मदत म्हणून रोजीरोटीसाठी पतंग विकायचा, पण ‘भाभी’ सिनेमात त्याने बेबीनंदा बरोबर खरोखरच ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ गात पतंग उडवला. त्या चित्रपटातलं दुसरं गाणं ‘चल उड जा रे पंछी’ चित्रगुप्तचे संगीत व पिक्चर हिट झाला. पुढे मोठे निर्माते पण ऑफर घेऊन जगदीपकडे आले, पण एव्हीएमने मध्ये टांग घातली. त्यांच्या स्वतःच्या ‘छोटी बहन’मध्ये पण त्याला अंगठा दाखवला गेला.

अशा कठीण परिस्थितीत जगदीप डगमगला नाही. तो आईने सांगितलेला एक शेर याद करायचा... वो मंझीलही क्या जो आसानीसे तय हो जाये, वो राह ही क्या जो थक के बैठ जाये।

मग जगदीप विनोदी भूमिकांकडे वळाला आणि त्यानंतर पुन्हा कुठेही वळला नाही. तसेही लीड रोल करायला त्याचा चेहरा त्या काळच्या गोंडस, पण मक्ख अभिनेत्यांसारखा नव्हता. उलट दारू न पिताही तो तांबारल्यासारखा वाटायचा, पण तो विलक्षण एक्सप्रेसिव्ह होता.बुमराहच्या यॉर्करप्रमाणे त्याचे संवादफेकीवर विलक्षण प्रभुत्व होते. त्याच्या बळावर तो साक्षात अमिताभ बच्चनसमोरदेखील आपला आब राखून असायचा.

अमिताभ तर म्हणायचा, त्याचा ‘सुरमा भोपाली’ त्याने इतक्यांदा पहिला आहे, पण प्रत्येक वेळी तो धमाल वाटतो. भोपाली कल्चर बतानेवाली ही ‘शोले’मधली त्याची सर्वात अजरामर भूमिका! पुढे ‘अंदाज अपना अपना’मध्ये त्याने बांकेलाल भोपाली असाच झक्क रंगवला होता. ब्रम्हचारी, अपना देश, एक नारी, एक ब्रम्हचारी, जिगरी दोस्त, कालिया, रोटी असे काही चित्रपट त्याने विनोदी भूमिकेतून यादगार बनवले. मात्र जॉनी वॉकर किंवा मेहमूदसारखं टॉप बिलिंग त्याला कधीच मिळालं नाही. अंगविक्षेपाच्या बाबतीत काही काळ असरानीने त्याची कॉपी केली, पण वाकुल्या दाखवून राजेंद्रनाथप्रमाणे त्याने माकडचेष्टा कधी केल्या नाहीत. एक खरं, त्यानं या विनोदवीरांच्या भाऊगर्दीत आपलं स्थान टिकवलं. त्याबद्दल त्याचं कौतुक केलं पाहिजे.

देवळालीला लागून असणार्‍या सौभाग्यनगरमध्ये जगदीपचा फ्लॅट होता. तो नेहमी राहायला यायचा. त्याचा युसूफ कम्बो नावाचा मित्र देवळालीत माझ्या क्लिनिकसमोर राहायचा. मुक्काम असला की जगदीप या मित्राकडे रोज यायचा. गेटबाहेर खुर्ची टाकून दोघे बसलेले असायचे. सिग्रेटशिवाय मी जगदीपला कधी पाहिले नाही. काही वेळा गप्पा मारायची संधी मिळाली. एक-दोनदा क्लिनिकमध्ये बीपी घ्यायलाही ते आले होते, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर स्वारी विनोदी सोडा, बोलायलाच फारशी उत्सुक नसायची.

अर्थात विनोदी माणसाने भेटेल तेव्हा विनोदी बोलावं ही अपेक्षा चुकीचीच! त्यांचा मित्र गेल्यावर मात्र गेली काही वर्षे जगदीप आलेले दिसले नाहीत.

जगदीप शेवटच्या काही वर्षात छोटे-छोटे रोल करायचा, पण त्याच्या भूमिकेचा ठसा स्लॉग ओव्हरमध्ये येऊन फटकेबाजी करणार्‍या हार्दिक पांड्यासारखा असायचा. मोजके चेंडू त्याच्या वाटयाला यायचे, पण चौकार-षटकारांची बरसात व्हायची. जगदीप छोटा, पण आठवणीत राहणारा डाव खेळून जायचा. ‘विधाता’मध्ये त्याचा तो डायलॉग ‘ये थम्स अप नहीं कम्स अप है’ चांगला आठवतोय. ‘शहेनशहा’मध्ये तो असंच काही म्हणायचा.

टू ब्युटीज, बोथ ऑन ड्युटी... एकदम खर्जात, तेही चिरक्या आवाजात तो बोलतो. त्याच्या या वेगळ्या स्टाईलमुळे हसून-हसून पुरेवाट होते. सात दशकं, चारशे चित्रपट, बालकलाकार, मग लीड रोल आणि नंतर प्रदीर्घ काळ कॉमेडी हे भांडवल त्याला बडा कलाकार म्हणण्यासाठी पुरेसं आहे. जगदीपच्या अल्लाको प्यारा होण्यामुळे एक चांगला, जाणकार विनोदी नट चित्रपट सृष्टीने गमावलाय हे मात्र खरं...!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com