झेडपीच्या 100 शाळांमधून ‘सेमी इंग्लिश’ हद्दपार

0

राहुरीतील ‘उद्योगी’ मास्तरांनी घेतले शालेय व्यवस्थापनाकडून ठराव; पालकांची नाराजी

उंबरे (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 247 शाळांपैकी तब्बल 100 शाळांमधून सेमी इंग्लिश हद्दपार करण्यात आले आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे ठराव घेऊन गावनिहाय काही ‘उद्योगी’ मास्तरांनीच सेमी इंग्लिश बंद करून आपल्यावरील कामाचा बोजा कमी करण्याची मोहीम राबविली आहे.

यामुळे खासगी इंग्लिश मीडियममधून आलेल्या व सेमी इंग्लिशसाठी जिल्हा परिषद शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. ‘कामचुकार’ शिक्षकांनी सेमी इंग्रजीचा आपल्यावरील भार टाळण्यासाठी स्थानिक पालकांना हाताशी धरून त्यांच्या ‘नथीतून तीर’ मारल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, विद्यालयांना सेमी इंग्लिश सुरू करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, त्या अटींची कागदोपत्री पूर्तता न झाल्याने हे सेमी इंग्लिश बंद केले असल्याची माहिती काही तज्ज्ञ शिक्षकांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेच्या पटाला विद्यार्थ्यांच्या हजेरीविना अवकळा आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या घटल्याने ती वाढविण्यासाठी सरकारने शालेय पातळीवर अनेक निर्णय घेण्यास सुरूवात केली. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्या पाल्यांना खासगी इंग्रजी शाळेत टाकण्याचा ओघ सुरू झाला.

त्यामुळे मराठी मातृभाषा असलेल्या जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडायला लागल्या. त्यामुळे इंग्रजी शिक्षण जिल्हा परिषद शाळेत शिकविण्यासाठी सेमी इंग्रजीचा नवीन अध्याय जिल्हा परिषद शाळेत सुरू झाला.

त्यासाठी सराकारच्या शैक्षणिक व्यासपीठावरून सेमी इंग्रजीसाठी काही अटी लादण्यात आल्या. तर काही ठिकाणी अधिकार्‍यांनी दिलेल्या तोंडी आदेशावरून सेमी इंग्रजी सुरू झाले. राहुरी तालुक्यातही सेमी इंग्रजीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.

मात्र, कोठे माशी शिंकली कोण जाणे? गेल्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे दरवाजे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बंद करण्यात आले. सेमी इंग्रजी बंद केल्याचे खापर आपल्या माथ्यावर फुटू नये, यासाठी काही मास्तरांनी तातडीने स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे सेमी इंग्रजी बंद करण्याचे ठराव करून घेतले.

विशेष म्हणजे राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी ज्या शालेय व्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या, त्यातील अनेक सदस्य चक्क अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना आपल्या शाळेत सेमी इंग्लिश बंद होत असल्याचे गावीही नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यावर्षी नव्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सेमी इंग्लिश बंद झाल्याचे समजताच अनेकांचा हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारने सेमी इंग्लिशचे ‘गाजर’ दाखविल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.

तर ज्या स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी ठरावात सहभाग घेतला, त्यांना या गोष्टीची कल्पना आल्यानंतर त्यांनीही ‘विश्‍वमित्री’ पवित्रा घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल पालकांनी केला आहे.

  • शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्लिश सुरू करण्याचा निर्णय घेतल्यापासून पटसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत सेमी इंग्लिश असायलाच हवे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान इंग्रजीसारख्या जागतिक भाषेची तोंडओळख होईल.
    – शशिकला पाटील (सदस्या, जिल्हा परिषद)
  • सेमी इंग्रजीमधून वर्ग सुरू ठेवणे, जास्त उपयुक्त आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्याठिकाणी डीएड पदवी प्राप्त झालेल्या शिक्षकांची नेमणूक असली पाहिजे. सेमी इंग्रजी सुरू ठेवणे अथवा बंद करण्याचे धोरण पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. तसा शासकीय अध्यादेश आहे.
    – सुलोचना पटारे (तालुका शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग)

LEAVE A REPLY

*