प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी काठमोरे

0

अशोक कडूस यांची औरंगाबादला बदली

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारीपदी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची बदली झाली आहे. नगरचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर बदली झाली आहे.
साधारण तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतून कडूस नगरला शिक्षणाधिकारी पदावर बदलून आले होते. त्यांच्या नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यकाळ चांगलाच गाजला होता.
आंतरजिल्हा शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेणे, शिक्षकांचे अनेक वर्षांपासून रखडलेले रोष्टरचे काम कडूस यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. यासह दोन वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र दिलेल्या 104 शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्यात आले.
यासह जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, तंत्रस्नेही शिक्षक चळवळीने चांगला जोर धरला होता.
पुण्याहून नगरला बदलून आलेले शिक्षणाधिकारी काठमोरे हे देखील नगरमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी होते. शिक्षण विस्तारअधिकारी पदावरून आपल्या शिक्षणाच्या जोरावर ते पुण्याला प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर काम करत होते.
असा योगायोग –
शिक्षणाधिकारी कडूस हे नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील रहिवासी असून ते अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत सुपा (ता. पारनेर) या ठिकाणी माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत होते. तर शिक्षणाधिकारी काठमोरे हे देखील नगर जिल्ह्याचे सुपूत्र असून त्यांनी नगर जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात विस्तार अधिकारी पदावर काम केलेले आहे.

LEAVE A REPLY

*