झेडपीकडून 65 अनुकंपाधारकांना नियुक्त्या

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- झेडपीकडून 65 अनुकंपाधारकांना रिक्तपदी बुधवारी नियुक्तया देण्यात आल्या आहेत. यावेळी अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्री ताई घुले यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. विषय समित्यांचे सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते.
झेडपी कर्मचारी कामावर असताना दिवंगत झाल्यास त्यांच्या कुटुंबावर आर्थिक आपत्ती ओढवते. त्याच्या कुटुंबीयांना पुढे आर्थिक मदत मिळावी यासाठी त्या कुटुंबातील दिवंगत कर्मचार्‍यांच्या एका वारासदारास अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे एकूण 308 जणांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केले होते.
मात्र, पात्र असलेल्या 187 प्रकरणांपैकी नियुक्ती आदेश देण्यासाठी उपलब्ध पदानुसार 141 उमेदवार पात्र ठरले. उर्वरित अनुकंपा धारकांच्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार रिक्त पदे उपलब्ध नाहीत. शासनाच्या धोरणानुसार एकूण रिक्त पदांच्या 10 टक्के पदे अनुकंपा भरतीसाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
यानुसार सद्यस्थितीत 65 पदे अनुकंपा भरतीसाठी उपलब्ध होती.सदर 141 उमेदवारांपैकी ज्येष्ठतेनुसार 65 पदांवर अनुकंपा भरतीसाठी शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यात येणार आहे. जे उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी पात्र ठरले आहेत अशा अर्जदारांना समुपदेशनाद्वारे पद निवडण्याची संधी देण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अनुकंपा नियुक्त्या रखडलेल्या होत्या. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या प्रयत्नातून या अनुकंपाधारकांना न्याय मिळाला आहे.

 

LEAVE A REPLY

*