‘जिल्हा नियोजन’चे पडसाद स्थायीच्या बैठकीत : निधीसाठी न्यायालयात जाणार

0
जिल्हा परिषदेच्या शिवसेना सदस्यांचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समिती जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर गदा आणत आहे. गेल्यावर्षी इतर जिल्हा मार्गाचा निधी खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्यांचा असतांना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर आमदारांनी जाणीवपूर्व जिल्हा परिषदेचा 28 कोटी रुपयांचा निधी पळवला होता. यंदा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या विरोधात न्यायालयीन पातळीवर लढा देण्याचा निर्धार सेनेचे सदस्य संदेश कार्ले आणि अनिल कराळे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभनंतर कार्ले, कराळे पत्रकारांशी बोलत होते. 5054 या हेडवर येणार निधी खर्च करण्याचा अधिकारी जि.प. सदस्यांना आहे. मात्र, मागील वर्षी हा निधी जिल्ह्यातील आमदारांनी वाटून घेतला. गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी 5054 हेडचा निधी वाट करण्यासाठी समन्वय समिती बैठक घेण्याचा ठरावच बेकायदा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गणपुर्तीची आवश्यकता नाही, असे पालकमंत्री राम शिंदे आणि जिल्हाधिकारी म्हणत असतील सभेचे इतिवृत्त कशासाठी तयार करता, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
याविषयी कार्ले, कराळे, अनिता हराळ, माधवराव लामखडे, प्रताप पाटील, सदाशिव पाचपुते यांनी चर्चा केली. अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्यावर या प्रकरणी दबाब असल्यास सर्व जि.प. सदस्य यांच्या सोबत खंबीर उभे राहतील असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सदस्य पाचपुते निकृष्ठ शालेय पोषण आहाराबाबत तक्रार केल्यानंतर पोषण आहाराचे बिल थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 2009 पासून रखडलेल्या आणि नियुक्तीसाठी पात्र असणार्‍या 2 प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नेमणुका देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महापालिकेने जिल्हा परिषदेला पाण्याच्या टँकरच्या करापोटी 6 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी असून दंडव्याजासह ही रक्कम 2 कोटी 52 लाख रुपये झाली असल्याचे कळवले आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी महापालिका अधिकार्‍यांसोबत चर्चा करून दंड व्याज कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. जि.प.चा महापालिकेकडे लाखा कोट्यावधी रुपयांचा शिक्षण कर थकीत असून हा कर तातडीने मिळावासाठी पाठपुरावा करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
विखे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, सदस्या सुप्रिया झावरे, महेश सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या पाणी योजनांना सौर प्रकल्पातून वीज उपलब्ध करून करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. याबाबत अधिकार्‍यांनी अभ्यास करून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले. हा विषय कार्ले, पाचपुते यांनी उपस्थित केला होता. 

जुलै महिन्यांत जिल्हा परिषद सदस्यांना पुण्याला यशदामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय सदस्यांचे गट तयार करून प्रशिक्षणाला पाठवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची तयारी सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात रिक्त असणारी ग्रामसेवकांची पदे अनुकंपातील पात्र उमेदवार आणि सरळ सेवा भरतीतून भरण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. 

 

LEAVE A REPLY

*