झेडपीच्या चार खात्यात प्रभारीराज

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाच्या चार खात्यांमध्ये सध्या प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती असून कायमस्वरुपी खाते प्रमुखांची संबंधित विभागांना सध्या प्रतीक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर झेडपीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खातेप्रमुखांची पदे रिक्त दिसून येत आहेत.
यामध्ये दोन पदे ही बदलीने तर दोन अधिकारी निवृत्त झाल्याने चार जागा खाली झाल्या आहेत. अनेक दिवसानंतर दीर्घ रजेवर गेल्यावर प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती केली गेली. याव्यतिरिक्त बहुतेक दिवस कायमस्वरुपीच अधिकारी झेडपीला मिळाला आहे. मात्र, बदल्यांमुळे पुन्हा कायमस्वरुपी अधिकार्‍यांची झेडपीत टंचाई जाणवू लागली आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भरत राठोड निवृत्त झाल्याने टाकळी ढोकेश्‍वर येथील डॉ. शेळके यांची सध्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांधकाम विभाग (दक्षिण) कार्यकारी अभियंता बाळासाहेब भोसले निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नगर तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता भागवत प्रभारी काम पाहत आहेत.
बांधकाम विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता नाईक यांची पुणे येथे सार्वजनिक बांधकाम विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी अकोला तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता मोकुडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी पी. डी गांडाळ यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे काम पाहत आहे.
आरोग्य विभाग अत्यावश्यक व महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे सर्व पदांवर अधिकार्‍यांची कायम नियुक्ती गरजेची आहे. प्रभारीराज नियुक्तीमुळे अधिकार्‍यांचे मूळ पदावरील कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्हीकडील कामे पूर्ण करताना चांगलीच दमछाक होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशापुढे करणार काय? असा प्रश्‍न अधिकार्‍यांकडून उपस्थित केला जातो. प्रभारीराजमधून आपली सुटका करण्यासाठी अधिकारी नविन अधिकार्‍यांची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

यादवांची जामखेडमधून सुटका
शेवाळे नवे गटविकास अधिकारी
जामखेडचे गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या निलंबनानंतर रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी परिक्षित यादव यांच्यावर सोपविण्यात आली होती. श्री. यादव यांनी आपल्या मूळ व महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळत जामखेडमध्ये जाऊन बीडीओचे काम पाहिले.अखेर बुधवारी पालकमंत्र्यांच्या तालुक्यासाठी नवीन गटविकास अधिकारी नियुक्तीचा आदेश प्राप्त झाला. श्री. यादव यांनी ‘सार्वमत’शी बोलताना शेवाळे यांच्या नियुक्ती बाबत अधिक माहिती दिली.

LEAVE A REPLY

*