नियोजन समितीसाठी जि.प. सदस्यांची फिल्डिंग

0

जिल्हा नियोजन समितीची निवडणुक 9 ऑगस्टला?

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषदेकडील 33 जागा रिक्त असून या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी आतापासून फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यांत जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या राज्यातील जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त जागांसाठी निवडणुका होणे बाकी आहे.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त जागांसाठी 9 ऑगस्टला निवडणुक जाहीर केली आहे. यामुळे नगरची निवडणुकही 9 ऑगस्टला होणार का? याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे.
नगर जिल्हा नियोजन समितीमध्ये 50 सदस्य आहेत. यात जिल्हा परिषदेच्या 72 सदस्यांमधून 33 सदस्यांचा या ठिकाणी समावेश आहे. 7 सदस्य हे नगरपालिका, महापालिका क्षेत्रातून या ठिकाणी निवडून देण्यात येतात. फेबु्रवारी महिन्यांत जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या. या निवडणुकीत 73 जिल्हा परिषद जागेपैकी 1 जागेवर निवडणुक झालेली नसून पांगरमल दारूकांडीत आरोपी असणारी एक महिला सदस्य फरार आहे.
यामुळे 71 जिल्हा परिषद सदस्यांमधून जिल्हा नियोजन समितीत 33 सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. तर नव्याने स्थापन होवून निवडणुका झालेल्या नगरपालिका हद्दीतून 3 सदस्य असे 36 सदस्य जिल्हा नियोजन समितीत निवडून देणे बाकी आहेत. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सध्या 36 जागा रिक्त आहेत.
यासह पालकमंत्री यांना नियोजन समितीत सहा सदस्यांची नामनिर्देशीत सदस्य म्हणून निवड करण्याचे अधिकार आहेत. समितीच्या उर्वरित चार सदस्यांमध्ये स्वत: पालकमंत्री अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्षा पदसिध्द सदस्या, जिल्हाधिकारी सचिव आणि वैधानिक विकास मंडळाचा प्रतिनिधी असे 50 सदस्य जिल्हा नियोजन समितीत आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या जागा निवडणुकीव्दारे भरण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता.
दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक जाहीर केली आहे. त्या ठिकाणी 9 ऑस्टला मतदान होणार असून मंगळवारी 18 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे नगरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असून आज सोमवारी याबाबत प्रत्यक्ष खुलासा होणार आहे.  रविवारी याबाबत जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी संपर्क केला. मात्र, संपर्क झाला नाही.

जिल्हा परिषदेतील बलाबल –  काँग्रेस 23 सदस्य, राष्ट्रवादी 18 सदस्य, भाजपा 14 सदस्य, सेना 7 सदस्य, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 5 सदस्य, महाआघाडी 2, कम्युनिष्ट 1, शेतकरी विकास आघाडी 1, जनशक्ती 1 यांचा समावेश असून यातून नियोजन समितीसाठी  33 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*