जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अधिकार्‍यांवर नाराजी

0

सर्व पक्षिय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना अधिकार्‍यांची बगल

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जवळपास सर्व पक्षीय सदस्यांनी सर्वच विभागातील आधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना अधिकार्‍यांबाबत निलंबन तसेच सक्तीची रजा आदीसह कठोर कारवाई करावी अशी सुचना केली.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात काल अहमदनगर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पिठासीन अधिकारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुपारी एक वाजता अध्यक्षासह सर्व सदस्यांनी विद्यापिठातील प्रकल्पाची शिवारफेरी केली. यामध्ये सिमेन प्रकल्प, शेळीमेंढी सुधार प्रकल्पसह विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षा विखे पाटील यांनी देशातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला. त्याच बरोबर नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतील विजयी उमेद्वार देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व समंतीने टाळ्याच्या गजरात समंत करण्यात आला.

सर्वसाधारण सभेसाठी सदस्या अनिताताई हराळ (नगर), सुषमाताई दराडे,अनिल कराळे (पाथर्डी, सुनील गडाख (नेवासा), राजेश परजणे(कोपरगाव), किरण लहामरे (अकोले), आदींनी एकूण 18 प्रश्‍न विचारले.
सदस्या अनिताताई हराळ यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या नसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रहात असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यावर नुतनीकरणासाठी जवळपास 9 लक्ष रूपये केलेला खर्च नियमबाह्य असून या खर्चाची संबधितांकडून वसूली करावी, अशी मागणी केली.

याबाबत मागील स्थायी समितीने परवानगी दिलेली असून माजी अध्यक्षांच्या त्यावर स्वाक्षर्‍या असल्याचे अध्यक्षा विखे यांनी सांगीतले. परंतू सर्वच प्रमुख सदस्यांनी यासाठी आपली नसल्याने आयुक्तांशिवाय मिळतेच कशी? या बाबत खुलासा करण्याची मागणी केली. सदस्य शरद नवले, कैलास वाघचौरे, कांतीलाल बोडके आदींनी याबाबत आधिकार्‍यांना धारेवर धरताना विकास कामासाठी सदस्यांनी निधीचा आग्रह धरल्यावर नियमांवर बोट ठेवणारे अधिकारी स्वत:च्या अखत्यारित मात्र नियमबाह्य खर्च करतात, असे सांगून अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली.

अकोल्याच्या सुषमाताई दराडे यांनी पिण्याच्या पाण्याची सगळ्यात जास्त निकड असताना पाणी पुरवठा योजना 12 महिने चालविण्याबाबत केलेल्या मागणीवर उत्तर देताना पाणी पुरवठा विभागाचे कदम मात्र संयुक्तीक उत्तरे देऊ शकले नाही. यासाठी तीन वेळा प्रश्‍न टाकूनही प्रशासनातील अधिकारी प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आश्‍वासन देऊन बोळवण करीत आहेत.

सुनील गडाख यांनीही पाणी पुरवठ्यातील नित्कृष्ट कामांबाबत तक्रार करतानाच पाण्याची टाकी गळते, पंप नादुरूस्त असताना सर्वच देयके देणारे अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात असल्याचे सांगून 18 लक्ष रूपये बाजारात किमंत असणार्‍या पंपाचे 81 लक्ष रूपये बील अदा करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशीची मागणी केली. पाणी पुरवठा विभागाचे कदम यांची मात्र उत्तरे देताना भंबेरी उडाली.

एकीकडे विकास कामांना निधीत शासन कपात करण्याचे धोरण घेत असताना आपल्या जिल्हा परिषदेचा मागील वर्षी जवळपास 49 कोटी रूपये निधी अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेला. त्यास जबाबदार कोण? असा सवाल राजेश परजणे सह शरद नवले व इतर सदस्यांनी केला.

तसेच पाणी पुरवठ्याचे टेंडर पंचायत समिती स्तरावर काढण्याचे अधिकार देण्यात येण्याबाबत ठराव करावा, अशी मागणी सभेत करण्यात आली. पावसाचे दिवस असताना जवळपास 72 रूग्णवाहिका केवळ चालकाविना पडून आहेत. यासाठी ठेकेदारीवर चालकांना निर्धारित वेतन ठेकेदारांंकडून न मिळाल्याने चालक मिळत नाहीत.तरी गोंदीया जिल्हा परिषदेप्रमाणे जिल्हा परिषद स्वत: चालकांची भरती करावी, अशी मागणी करण्यात आली.

शासनाचा मोठा निधी रूग्ण सेवेवर उपलब्ध असताना केवळ अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे सेवा मिळत नसल्याची तक्रार सर्वपक्षीय सदस्यांनी केली.बचत गटांचे कामकाज पुर्वीच्याच पध्दतीने सुरू राहवे, अशी मागणी करतानाच शिलाई मशिन व इतर वस्तूंच्या किमंतीचे ज्याप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे नियोजन आहे त्याचप्रमाणे पोषन आहाराचेही पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावरच जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली. सदस्या हर्षदा काकडे यांनीही पाणी पुरवठा, बचत गट, रूग्ण सेवा याबाबत सुुचना केल्या. बारागावं नांदूरचे सदस्य शिवाजीराजे गाडे यांनी आपल्या गटात सर्वसाधारण सभेस उपस्थित सदस्यांचे स्वागत करताना मौलिक सुचना केल्या.

विविध खात्यातील अधिकार्‍यांना समर्पक उत्तरे न देता आल्याने अध्यक्षा विखे पाटील यांनीही नाराजी व्यक्त करून यापुढे कामकाजात सुधारणा न केल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी दिली. जिल्हा परिषदेमार्फत होणार्‍या सर्वच कामांची प्रत, गुणवत्ता याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देतानाच 30%, 25% वर कामे घेणार्‍या ठेकेदारांच्या कामावर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा होऊन मागील काळातील विविध खात्यातील दाषी अधिकार्‍यांवरील चौकशीवर चर्चा होऊन याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याचा ठराव संमत करण्यात आला.

सभेसाठी उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, समाज कल्याण विभागाचे सभापती उमेश परहार, पशूसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे, कैलासराव वाकचौरे, अनुराधाताई नागवडे, सभापती क्षितीज घुले, मनिषाताई ओहळ, सौे कोकणे, सौे. मेंगाळ, रामदास भोर, सुभाष आव्हाड, अ‍ॅड. निघुते अधिकारी अशोक गल्हे, परीक्षित यादव, डॉ. पी.डी. गांडाळ, उज्वलाताई बावके, आदींसह सदस्य, सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सदस्यांच्या प्रश्‍नाबाबत निरसन करतानाच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

*