Type to search

Featured सार्वमत

झेडपीच्या 11 अधिकार्‍यांवर बदल्याची टांगती तलवार

Share

पोलीस, महसूलच्या धर्तीवर यंदा ग्रामविकास विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या धर्तीवर यंदा जिल्ह्यातील ग्रामविकास विभागातील महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल करण्याच्या विचारात निवडणूक विभाग आहे. यासाठी राज्य निवडणूूूक आयोगाने जिल्हा परिषदेत कार्यरत असणार्‍या विकास सेवा सवंर्गातील 11 अधिकारी यांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग या अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत निर्णय घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा बिगूल पुढील महिन्यांत वाजण्याची शक्यता आहे. या निवडणूक प्रक्रियेत महसूल व पोलिस अधिकारी हे राजकीय नेते वा पक्ष यांच्या आहारी जावू नयेत, यासाठी जिल्ह्यातील रहिवास आणि सलगपणे तीन वर्षे जिल्ह्यात सेवा करणार्‍या जिल्हाबाहेरील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. त्याच धर्तीवर निवडणूूक आयोग ग्रामविकास विभागातील अधिकार्‍यांचाही बदल्या करण्याच्या मूडमध्ये आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाकडून महाराष्ट्र विकास सेवा संवर्गात स्व जिल्ह्यात कार्यरत अधिकारी, तसेच तीन वर्षांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांची माहिती मागवली आहे.

त्यानुसार विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हा परिषदेतील कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या 10 वर्षांचा सेवा तपशील मागविला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने स्व जिल्हा, तसेच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण, जिल्ह्यातील चार वर्षे सेवा व गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काम केले आहे किंवा नाही, अशा चार मुद्यांवर प्रत्येक अधिकार्‍यांची माहिती मागवली असून ही माहिती राज्य निवडणूूूक आयोगाला सादर करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर हे नगर जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. तर उर्वरित तीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यात तीन वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केलेला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 15-20 दिवसांत आचारसंहिता लागू शकते. त्यापूर्वीच या अधिकार्‍यांच्या बदल्या होऊ शकतात. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, रोहयोच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांच्यासह राहुरीचे बीडीओ गोविंद खामकर, राहात्याचे बीडीओ समर्थ शेवाळे, संगमनेरचे बीडीओ शिंदे, नेवाशाचे बीडीओ शेखर शेलार, नगरच्या बीडीओ अलका शिरसाठ तसेच शेवगाव व पाथर्डीच्या गटविकास अधिकार्‍यांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!