झेडपी शाळांची गुणवत्ताही खाजगीच्या बरोबरीची : 14 हजार मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना रामराम

0

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 

गणोरे (वार्ताहर) – राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याची बाब समोर आली असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या सुमारे14 हजार मुलांनी मागीलवर्षी रामराम ठोकत चक्क जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे सुमारे 45 हजार शाळा प्रगत झाल्या आहेत. पासष्ट हजार शाळा डिजीटल झाल्या आहेत. तीन हजार शाळा आय.एस.ओ मानांकित आहे. केंद्र सरकारच्या शाळासिध्दी मूल्यांकनाला राज्यातील सुमारे एक लाख पाच हजार शाळांपैकी पस्तीस हजार शाळा या अ श्रेणीत आल्या आहेत. राज्यातील विविध व्यवस्थापनाच्या शाळांची गुणवत्तेत फारसा फरक नसल्याची बाबही समोर आली असून काही विषयांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा या इतर व्यवस्थापनापेक्षा वरचढ असल्याचे समोर आले आहे.
राज्याचे शैक्षणिक चित्र स्पष्ट करणारा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून त्यातही माहिती देण्यात आली आहे.पालघर मध्ये इंग्रजी माध्यमातील तिसरीतील मुले व पुण्यासारख्या प्रगत जिल्हयात तर चक्क सहावीच्या मुले निरक्षर असल्याचेही अधोरेखीत झाले आहे. राज्यात पन्नास टक्केपेक्षा अधिक उत्तरे देण्याचे प्रमाण पहाता भाषेत 73 टक्के , मानवीय शास्त्रात अवघे 26 टक्के तर विज्ञानात 22 टक्के ,गणितात 22 टक्के व इंग्रजीत 19 टक्के गुणवत्तेचे प्रमाण आहे, विचारलेल्या प्रश्नापैकी 75 टक्के उत्तरे देऊ शकणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण भाषे करीता अवघे 30 टक्के आहे.
उर्वरीत विषयात मात्र दोन ते शुन्य टक्के असल्याचे आढळून आले आहे.हे प्रमाण लक्षणीय घटलेले आहे.राज्यात व्यवस्थापन निहाय गुणवत्तेचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळामध्ये प्रथम भाषेत 65.75 टक्के, मानवीय शास्त्र 60.25 टक्के ,विज्ञान 61 टक्के गणितात 60.75 टक्के तर इंग्रजीत 61.75 टक्के गुणवत्ता आहे.त्याचवेळी खाजगी अनुदानित शाळांची गुणवत्ता प्रथम भाषेत 59 टक्के, मानवीय शास्त्र 62.25 टक्के ,विज्ञान 61 टक्के गणितात 63.25 टक्के तर इंग्रजीत 61.5 टक्के गुणवत्ता असल्याचे आढळून आले आहे.स्वयं अर्थसाहित शाळांची गुणवत्ता ही प्रथम भाषेत 65.25 टक्के, मानवीय शास्त्र 64.25 टक्के ,विज्ञान 63.25 टक्के गणितात 65.25 टक्के तर इंग्रजीत 63.5 टक्के गुणवत्ता आहे.
राज्यात ग्रामीण व शहरी भागाचा विचार करता शहरी भागापेक्षा खेडयातील पोर हुशार असल्याची बाबही या संशोधनात पुढे आली आहे.ग्रामीण भागातील मुले प्रथम भाषेत शेकडा 65 टक्के ,मानविय शास्त्रात 63.5 टक्के विज्ञानात 61.75 टक्के ,गणितात 64.25 टक्के गणितात 62.25 टक्के गुणवत्ता असल्याची बाब समोर आली आहे.तर शहरी भागातील पोरांचा भाषेत काहीसा वरचष्मा राहीला आहे.
प्रथम भाषेत 67 टक्के,मानवीय शास्त्रात व विज्ञानात 61 टक्के ,गणितात 62.5 टक्के तर इंग्रजीत मात्र 61.75 टक्के गुणवत्ता असल्याचे अहवाल नमूद केले आहे. राज्यातील गुणवत्तेचा विचार करता मुलांपेक्षा मुली हुशार असल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील विविध बोर्डाच्या गुणवत्तेची तुलना करता सीबीएसई , व आयसीसीई बोर्डापेक्षा राज्य बोर्डाची गुणवत्ता ढासळल्याची बाब समोर आली आहे.कर्नाटक व केरळ राज्यापेक्षाही आपली मुले मागे आहेत.सदरचा अहवाल राज्याच्या विद्या प्राधिकरमाने तयार केला असून या संशोधन अहवालामुळे राज्याची गुणवत्ता उंचावण्याकरीता प्रयत्न करण्याची गरज असल्याची बाब समोर आली आहे.
ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर बोट ठेवणार्‍या अनेकांना या निमित्ताने धक्का बसला आहे.शहरी भागात मोठया प्रमाणावर शिकवणी सारखे प्रकारात विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत असताना देखील गुणवत्तेत मात्र त्याचा फारसा परिणाम अधोरेखीत झाला नसल्याची बाब समोर आली आहे.
  • ग्रामीण भागातील पोर शहरी भागापेक्षा हुशार
  • मुलांपेक्षा मुलीची गुणवत्ता चांगली
  • राज्यबोर्डाची मुलांची गुणवत्ता इतर मुलांपेक्षा कमी
  • इंग्रजी माध्यमातही तिसरी आणि सहावीत निरक्षर मुले आढळली
  • राज्यात 45 हजार शाळा प्रगत झाल्याचा केला दावा
  • 65 हजार शाळा डिजीटल
  • 1,54,921 विद्यार्थी नववीच्या वर्गात मागे राहीला. सरलच्या माध्यमातून मिळाली माहिती.

 

LEAVE A REPLY

*