हतबल पदाधिकारी, निराश सदस्य अन् निगरगट्ट प्रशासन

0

जिल्हा परिषद : तुझं माझं जमेना..अन तुझ्या वाचून करमेना

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व विभागांच्या कामकाजासमोर पदाधिकारी हतबल तर सदस्य निराश झाल्याचे दिसले. कामे होत नाहीत, अधिकारी सदस्यांना योग्य मानसन्मान देत नाहीत. योजनांच्या अंमलबजावणींचा खुंटलेला वेग, प्रशासनाकडून होणार्‍या असहकार्या याचे तीव्र पडसाद सभेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उमटले. अखेर येत्या 14 तारखेला जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांसह तालुक्याचे गट विकास अधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्या ठिकाणी अधिकार्‍यांचे कान उपटण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांना जाहीर करावा लागला.
मात्र, या सर्व गोंधळात प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्य यांचे तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…अशीच स्थिती असल्याचे चित्र समोर आले.

शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. विषय पत्रिकेवरील पहिल्याच आरोग्य विभागाच्या विषयात स्त्री भ्रूण हत्येच्या विषयावरून सदस्यांनी प्रशासनाला घेरले. सदस्यांनी विचारलेले प्रश्‍न आणि प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या दुसर्‍याच माहितीमुळे अनेक वेळा चर्चेचे रूपांतर जोरदार खडाजंगीत झाले. आरोग्य विभाग, जिल्हा शिक्षक पुरस्कार, मागील सभेचा अनुपालन अहवाल, जिल्हा परिषदेच्या मालमत्ता या विषयांवर खमंदार चर्चा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने अखेरपर्यंत ठोस निर्णय झाला नाही. सदस्य आणि पदाधिकार्‍यांकडून किमान एका अधिकार्‍यांवर टोकाची कारवाई करावी, याचा धडा इतरांना बसेल अशी मागणी केली. मात्र, अखेरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी माने त्याला बधले नाहीत.

कोपरगाव, श्रीरामपूर आणि पारनेर गट विकास अधिकार्‍यांकडून सदस्यांचा शिष्टाचार पाळला जात नाही. सदस्यांना चुकीची आणि अपमानस्पद वागणूक मिळते. पंचायत समिती पातळीवर अधिकारी सदस्यांना विश्‍वासत घेत नाहीत. त्यांनी विचारलेली माहिती देत नाही. सदस्यांसोबत अर्वाच्य भाषेत बोलतात आदी आरोप यावेळी झाले. त्यावर श्रीरामपूरच्या गटविकास अधिकार्‍यांची बदली झाली असून त्यांची 1 ते 4 प्रपत्रात विभागीय आयुक्तांकडे चौकशी लावण्यात आली आहे. कोपरगावच्या गट विकास अधिकार्‍यांची बदली करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असून त्यांचीही 1 ते 4 प्रपत्रात विभागीय आयुक्त यांच्याकडे चौकशी लावण्यात आली अशी माहिती माने यांनी सभेला दिली.

सभेच्या शेवटी कराटे प्रशिक्षण योजनांचा विषय निघताच पारनेरच्या सदस्य उज्ज्वला ठुबे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून असंदीय भाषा वापरल्याचा आरोप केला. यामुळे सदस्यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांचा निषेध करत मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षा विखे यांनी दिले. असाच अनुभव अकोलेचे सदस्य गणपत देशमुख यांनी महिला बालकल्याण अधिकारी माने यांचा आला असल्याचे सभागृहात सांगितले. यावेळी सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नाची माहिती अधिकार्‍यांना देता आली नाही. मात्र, सभा संपल्यानंतर सर्व काही अलबेल असल्याच्या अविभावात सदस्यही निघून गेले.

जिल्हा शिक्षक पुरस्कार रद्द करा
सभेत शिक्षण विभागाच्या प्रश्‍नादरम्यान सदस्य सुनील गडाख यांनी जिल्हा शिक्षक पुरस्कारात गोंधळ झालेला आहे. यामुळे दिलेले पुरस्कार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात यावी, तालुकास्तरावर झालेल्या प्रशिक्षणात गांेंधळ झालेला आहे. शिक्षकांच्या परीक्षेच्या पेपर बाबत शंका उपस्थित केली. मुळात ही परीक्षा कशासाठी घेतली असा सवाल सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला. त्यावर सदस्य राजेश परजणे यांनी पुढील वर्षी 100 गुणांची परीक्षा घेण्याची मागणी केली. पशुसवंर्धन विभागाच्या कामकाजावर आरोप होत असतांना सदस्य परजणे आणि वाकचौरे यांच्या तू-तू मै-मै झाली.

रस्ते खोदाईबाबत बांधकाम विभाग अनभिज्ञ
सभेत विषय पत्रिकेवर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने पाच तालुक्यांत जिल्हा परिषदेचे रस्ते खोदण्यास पारवानगी मागितल्याचा विषय ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात कंपनीकडून खोदाई सुरू झालेली असताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यामुळे सदस्य संतप्त झाले होते. अखरे संदेश कार्ले यांनी या कंपनीच्या पाईपलाईन मुळे ज्या भागातून ही पाईप लाईन जाणार आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजून 9 मिटर काहीच करता येणार नाही. यामुळे अधी सर्व खात्रीकरून जिल्हा परिषदेने परवानगी द्यावी, असे आवाहन केले. तसेच बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे आणि त्यांची समिती या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थायी समिती समोर अहवाल ठेवणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्याची सूचना सदस्य गडाख यांनी केली.

LEAVE A REPLY

*