Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

झेडपी मुख्यालयातील पाणी पिण्यास अयोग्य

Share

जलजन्य आजारांचा धोका : पाणी नमुने आले दूषित

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य आले असल्याचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्याचा कारभार ज्या जिल्हा परिषदेतून चालविला जातो, तेथील कर्मचार्‍यांसह कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना हेच पाणी प्यावे लागते. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराचा धोका वाढला आहे.

जिल्हा परिषदेतून जिल्ह्याच्या ग्रामीण कारभाराचा गाडा हाकला जातो. त्या मिनी मंत्रालयातील कर्मचार्‍यांसह येणार्‍या असंख्य नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असेल तर यापेक्षा गंभीर बाब कोणती. नुकतीच जिल्हा परिषदेतील पिण्याच्या पाण्याचे प्रयोगशाळेत नमुने पाठवले होते. यात हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने हा प्रकार समोर आला आहे.

नुकतेच जिल्ह्यातील 90 गावांमध्ये सध्यस्थितीत दूषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याचा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालातून ही आकडेवारी उघड झाली आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो. ग्रामीण भागातील अशी अवस्था असताना मुख्यालयातील देखील पाणी पिण्यास अयोग्य असल्याच्या अहवालाने मात्र सर्वांचेच लक्ष आता पाण्याकडे लागले आहे.

याबाबत जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा कक्षासमोरील पिण्याच्या पाण्याचे नमूने पाठवले होते. त्याचा अहवाल अयोग्य आला होता. नंतर प्रशासकीय इमारतीतील पिण्याच्या सर्व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनातील योग्य व इतर सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या पाण्याचा वापर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांसह येथे येणारे नागरिक पिण्यासाठी करतात. परंतु हे दूषित पाणी पिल्यास जलजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरिन प्रक्रिया केल्यानंतर व सूक्ष्मजीव पुनर्तपासनणीनंतर हे पाणी पिण्यास वापरता येऊ शकते असा अभिप्राय प्रयोगशाळेने दिला आहे.

बांधकाम विभागास स्वच्छतेच्या सूचना
जिल्हा परिषदेतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेने तपासून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. याबाबत बांधकाम विभागास पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून, पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या आहेत.
– डॉ. सांगळे (जिल्हा आरोग्य अधिकारी)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!