Type to search

Featured सार्वमत

जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे सत्ता राखण्याचे आव्हान!

Share

अध्यक्ष पदावर आरक्षणाची शक्यता विखे यांची भूमिका महत्त्वाची

अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी भाजप प्रवेश करत विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. लवकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषदेत अध्यक्षांचा कार्यकाळ संपणार असून त्यानंतर पुन्हा सत्ता स्थापण्यासाठी युती आणि आघाडी सरसावणार असून यात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

येत्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाची मुदत संपणार आहेत. तत्पूर्वी पुढील अडीच वर्षासाठी आरक्षणाची सोडत निघणार आहेत. गत तिनवेळा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण अथवा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी होते. यामुळे पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपदावर आरक्षण निघण्याची शक्यता आहे. ते जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. डॉ. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुकीत विजय मिळवला आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे अद्याप काँग्रेसमध्ये असले तरी केव्हाही पक्ष सोडण्याची तयारी सुरू आहे. डॉ. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विखे व थोरात यांच्यात वाद उफाळून आला व प्रचार सभांमधून तो टोकाला गेला. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या थोरात गटाने मोर्चेबांधणी केली. पण या निवडणुकीत विखे विजयी झाल्याने राजकीय गणिते पुन्हा बदलली आहेत.

राखीव पदावर जुगार खेळणार ?

सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे व उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रसचे 23, राष्ट्रवादीचे 19 सदस्य आहेत. तसेच भाजपचे 14 व शिवसेनेचे 7 सदस्य आहेत. यातील पारनेरचे लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. याव्यतिरिक्त क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 5, कम्युनिस्ट पक्ष 1, महाआघाडी 2, जनशक्ती आघाडी 1 व अपक्ष 1 असे एकूण 73 सदस्य आहेत. काँग्रेसच्या 23 सदस्यांमध्ये विखेंना मानणारे 13 सदस्य आहेत. विखेंनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जवळपास अंतिम झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता विखे व युती यांच्याकडे आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवाय बदललेल्या समीकरणानुसार 73 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी आवश्यक असलेले 37 चे संख्याबळ गाठण्यासाठी विखे व युतीला काही सदस्य कमी पडणार आहेत. पण अध्यक्षपद राखीव निघाल्यास विखे या ठिकाणी जुगार खेळणार का? असा प्रश्‍न आहे. अशा वेळी विखे यांची भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!