Saturday, April 27, 2024
Homeनगरझेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत ग्रामविकास विभाग कन्फ्यूज

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत ग्रामविकास विभाग कन्फ्यूज

एकाच दिवशी दोन आदेश नोटीस काढूनच होणार जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकार्‍यांच्या निवडीचा कार्यक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापती आणि पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीच्या कार्यक्रमावरून राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागात गोंधळाचे वातावरण आहे. यानिवडी आधी 21 डिसेंबरपूर्वी कराव्यात, असे आदेश दिल्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी ग्रामविकास विभागाने दोन स्वतंत्र आदेश काढले आहेत. यातील सुधारित आदेशानुसार 20 डिसेंबरला या पदाधिकार्‍यांची मुदत संपत असल्याने त्या ठिकाणी नवीन निवडी करण्यासाठी प्रचलित पध्दतीनुसार नोटीस काढून या निवडी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानूसार जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या सभापतींच्या सोडती या शुक्रवारी 13 डिसेंबर काढण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिवशी अडचण आल्याने आता या सोडती जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत गुरूवारी होणार आहेत. चठ्ठ्या टाकून होणार्‍या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी- महिला 1, व्यक्ती 1, अनुसूचित जमाती- व्यक्तीसाठी 1, ओबीसी- महिला 2, व्यक्तीसाठी 2, सर्वसाधारण – 4 महिला, 3 व्यक्तीसाठी असे 14 पंचायत समितीमधील सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदावरील व्यक्ती आणि अन्य विषय समित्यांच्या विषय समित्याच्या सभापती, पंचायत समिती सभापतींची मुदत सप्टेंबर महिन्यांत संपली होती. मात्र, त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या कारणावरून या पदांना 120 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 20 डिसेंबरला संपणार असल्याने आधी ग्रामविकास विभागाने 21 डिसेंबरपूर्वी नवीन पदाधिकार्‍यांची निवड व्हावी, असे आदेश ग्रामविकास विकास विभागाचे उपसचिव र.आ. नागरगोजे यांनी काढले. मात्र, हे आदेश काढल्यानंतर पुन्हा मंगळवारी सायंकाळी सुधारित आदेश काढून ही जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकार्‍यांची मुदत 20 डिसेंबरला संपत असली तरी प्रचलित पध्दतीने नोटीस काढून अध्यक्षांसह अन्य पंचायत समिती पदाधिकार्‍यांच्या निवडणूकांबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.

या निवडीबाबत ग्रामविकास विभागाचा गोंेधळ सुरू असल्याने जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांना या निवडीचा कार्यक्रम तयार करण्यात अडचणी येत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाने या निवडीचा कार्यक्रम तयार करून सात दिवासांची नोटीस देवून या पदाधिकार्‍यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यास 21 डिसेंबरला नव्याने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, अन्य विषय सभापती आणि पंचायत समिती पदाधिकार्‍यांची निवड होवू शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

राजकीय पक्ष सक्रिय
जिल्हा परिषदेत नव्याने पदाधिकारी निवडीसाठी आता अवघा काही दिवसांचा कालावधी असल्याने जिल्ह्यातील राजकीय पक्ष सरसावले आहेत. मंगळवारी भाजपचे प्रतोद जालींदर वाकचौरे आणि राष्ट्रवादीचे प्रतोद असणार्‍या मात्र, त्यांच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कैलास वाकचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून नूतन पदाधिकार्‍यांच्या निवड प्रक्रियेची माहिती घेतली.

जिल्हा परिषदेत अंक गणित
जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार. कोणत्या पक्षाचे किती सदस्य आहे. ऐनवेळी कोण-कोणासोबत जाणार. राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळू शकते. ऐनवेळी भाजप विखेंच्या मदतीने चमत्कार करून शकते का? सेना कोणासोबत राहणार. नेवासा तालुक्यातील गडाख गटाचे सदस्य काय भूमिका घेणार अपक्ष, महाआघाडी, कम्युनिष्ठ पक्षाचे सदस्य कोणासोबत जाणार. जनशक्ती मंचाच्या हर्षदा काकडे काय करणार याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या