Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मिनीमंत्रालयाला अध्यक्ष निवडीचे वेध; मुख्यमंत्री निवडल्यावर होणार नव्या कारभार्‍यांची निवड

Share

नाशिक ।  प्रतिनिधी

मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांचा कार्यकाळ सप्टेंबरातच संपला होता. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विधानसभेच्या निवडणुकांमुळे शासनाने या पदाधिकार्‍यांना मुदतवाढ दिली होती. आता राज्याचा मुख्यमंत्री निवडला गेल्यावर झेडपीच्या अध्यक्ष आणि अन्य पदाधिकार्‍यांची देखील निवड करावी लागणार असून अध्यक्षपदाच्या सोडतीकडे जिल्हा परिषदेतील कारभार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

दुष्काळ आणि विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीला शासनाने मुदतवाढ दिल्याने अडीच वर्षांनंतर बदलण्यात येणार्‍या अध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत देखील काढण्यात आलेली नव्हती. विद्यमान पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ दि.20 सप्टेंबरला संपला असल्याने विधानसभेनंतर आता लगेचच मिनी मंत्रालयातील सत्तासंघर्ष बघायला मिळणार आहे.मुदत संपत आली असताना दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीलाप्रारंभी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा कालावधी आणखी एक महिन्याने वाढवून दिला होता. आता ही निवडणूक संपल्याने डिसेंबर महिन्यात पदाधिकार्‍यांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येत्या महिन्याभरात शासनाला अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे आगामी अडीच वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या संवर्गाकरिता आरक्षण जाहीर होते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी अन् विरोधकदेखील तयारीत

जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पुन्हा अडीच वर्षाचा कार्यकाळ आपल्याच ताब्यात रहावा; यासाठी तयारीत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाला शह देऊन सत्ता खेचून आणण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जाण्याची चिन्हे आहेत. अर्थात विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या राजकीय रणधुमाळीची किनार या रस्सीखेचीत बघायला मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!