प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावरील लसी उपलब्ध ठेवा

0

जिल्हा परिषद आरोग्य समितीचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी) – पावसाळ्याच्या दिवसात वाढणारे सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरावर आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथ उदभवून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्यास संबंधित ग्रामपंचायत व ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य समितीची बुधवारी सभा पार पडली. दरम्यान यासंदर्भात निर्णय घेऊन ठराव घेण्यात आला आहे.
गावकर्‍यांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे आहे. असे असताना जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कक्षाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील 103 गावांमध्ये दूषित आढळून आले आहेत. यामध्ये राहुरी, अकोले व शेवगाव तालुक्यातील सर्वाधिक गावे आहेत.तालुकानिहाय गावांची संख्या: नगर-5, अकोले-17, जामखेड-1, कर्जत-4, कोपरगाव-6, नेवासा-3, पारनेर-10, पाथर्डी-9, राहाता-2, राहुरी-25, शेवगाव-14, संगमनेर-3, श्रीरामपूर-8 आदी 103 गावामध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत.
या पार्श्‍वभूमिवर आरोेग्य समितीच्या बैठकीत दूषित पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या गावांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्षा व समिती सभापती राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.पावसाळ्यात सर्पदंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर वाढीव लसी उपलब्ध ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले. मंजूर केंद्र व उपकेंद्राचे कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी समिती सदस्य सीताराम राऊत, पुष्पाताई वराळ, रामभाऊ साळवे, कविता लहारे, पंचशिला गिरमकर, सोमनाथ पाचारणे, समिती सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी बापुसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

56 हजार संशयितांची तपासणी -1 जानेवारी 2017 पासून जिल्ह्यात 59 स्वाईनफ्ल्यूचे रुग्ण आढळून आले. दरम्यान त्यांच्या परिवारातील सदस्यांसह इतर संशयित असलेल्या 96 हजार 390 जणांची जिल्ह्यातील एकूण 96 प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली.तालुकानिहाय संख्या अशी: संगमनेर-85, नगर-10, कर्जत-67, अकोले, कोपरगाव प्रत्येकी -10नेवासा-13, पारनेर-43, राहुरी-4, शेवगाव-5, श्रीगोंदा-14, श्रीरामपूर-12 आदी .दरम्यान टॅनीफ्ल्यू औषध देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आला. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

टिसीएलविना पाणी –  शुध्दिकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर बहुतेक ठिकाणी कमी गुणवत्तेची वापरली जात असल्याचे क्लोरीनच्या प्रमाणावरून लक्षात येते. तर, धक्कादायक बाब म्हणजे नेवासा तालुक्यातील फत्तेपूर व जामखेड तालुक्यातील मुंजेवाडी येथे जूनमध्ये केलेल्या तपासणीत टिसीएल पावडरच उपलब्ध नसल्याने अशुध्दच पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

  16 गावांत क्लोरीनचे प्रमाण कमी  – ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यापूर्वी पाणी शुध्दिकरणासाठी वापरण्यात येणार्‍या टिसीएल पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण 33 टक्के पर्यंत असणे आवश्यक असताना तब्बल 16 गावांतील ते प्रमाण 20 टक्के पेक्षा कमी आढळून आले आहे. यामध्ये अकोले तालुक्यातील गावांची संख्या सर्वाधिक आहे. नगर, पारनेर व शेवगाव तालुक्यांतील गावांचा समावेश असून ग्रामपंचायतीकडून खरेदी करण्यात येणार्‍या टिसीएल पावडरची गुणवत्ता व खरेदीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

LEAVE A REPLY

*