आधी पदरमोड अन् नंतर अनुदान : समाजकल्याण विभागाचे पाच हजार सायकली वाटपाचे उद्दिष्ट

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या आदेशानुसार आता वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना आधी साहित्याची खरेदी करावी लागत आहेत. खरेदी झाल्यानंतर संबंधित साहित्याचे बिल सादर केल्यानंतर त्याच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने यंदा दोन कोटी 10 लाख रुपयांतून पाच हजार 194 सायकली देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता यंदा या योजनेला कितपत यश येईल, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.
गेल्यावर्षी राज्य सरकारने आदेश काढून वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना साहित्याऐवजी त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्‍या विविध योजनांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता योजना राबविताना अनेक अडचणी समोर येताना दिसत आहेत. विशेष करून मागासवर्गीयांना या निर्णयाचा फटका बसताना दिसत आहे.
मागासवर्गीय लाभार्थ्यांकडे साहित्य घेण्यासाठी पैसे नसल्याने ते योजनेच्या लाभापासून लांब जात असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी समाज कल्याण विभागाच्या साहित्या वाटपात ही बाब समोर आली आहे.
यंदा समाज कल्याण विभागाने लेडीज सायकल आणि पुरूषाच्या सायकलींसाठी 2 कोटी 10 लाख रुपायांची तरतूद केली आहे. यात 2 हजार 750 लेडीज सायकल आणि 2 हजार 444 पुरुषांच्या सायकलींचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. एका लेडीज सायकलची किंमत 4 हजार निश्‍चित करण्यात आली असून पुरूषांच्या सायकलची किंमत 4 हजार 500 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.
यानूसार तालुकानिहाय उद्दिष्ट ठरवण्यात आले असून लाभार्थ्यांच्या यादीला समाज कल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी घेतल्यानंतर तालुक्याला याद्या पाठवण्यात येणार आहेत.
त्या ठिकाणी मंजूर यादीतील लाभार्थ्याला आधी सायकल विकत घ्यावी लागणार असून त्यानंतर त्याचे बिल पंचायत समिती पातळीवर सादर करावे लागणार आहे.

त्यानंतर समाज कल्याण विभाग लाभार्थ्याने सायकल खरेदी केली की नाही याची खात्री करणार असून त्यानंतर तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हास्तरावर येऊन त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय लाभार्थी- अकोले 210 लेडीज, 195 पुरुष. संगमनरे 310 लेडीज, 295 पुरुष. कोपरगाव 125 लेडीज, 120 पुरुष. राहाता 225 लेडीज, 220 पुरुष. श्रीरामपूर 125 लेडीज, 120 पुरुष. नेवासा 225 लेडीज, 215 पुरुष. शेवगाव 185 लेडीज, 170 पुरुष. पाथर्डी 135 लेडीज, 125 पुरुष. नगर 190 लेडीज, 150 पुरुष. राहुरी 135 लेडीज, 125 पुरुष. पारनेर 135 लेडीज, 125 पुरुष. श्रीगोंदा 195 लेडीज, 175 पुरुष. जामखेड 50 लेडीज, 50 पुरुष आणि कर्जत 505  लेडीज, 349 पुरुष.

LEAVE A REPLY

*