जिल्हा परिषद करणार व्हॉटस्अ‍ॅपचा वापर; समस्यांचे होणार निराकरण

जिल्हा परिषद करणार व्हॉटस्अ‍ॅपचा वापर; समस्यांचे होणार निराकरण

नाशिक । प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांबरोबरच जि. प. सदस्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आता व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यास सर्वसमावेशक असा क्रमांक देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर नोंदवल्या जाणार्‍या तक्रारींचा 24 तासांत अधिकार्‍यांना प्रतिसाद देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पीएमएस) ही ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कामांच्या नोंदी यापुढे ऑनलाईन स्वरुपात केल्या जातील. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार व विभागाचे अधिकारी यांनी ऑनलाईन नोंद केल्यावर कामाची देयके दिली जातील. या स्वरुपाची ही प्रणाली ठेकेदारांसाठी अडथळा ठरत असल्याने अनेक महिने बिल रखडल्याच्या तक्रारी ठेकेदारांच्या आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्यांनीदेखील या प्रक्रियेमुळे निधी खर्च होत नसल्याचे सांगत प्रणाली एप्रिलपर्यंत बंद करण्याची मागणी केली होती.

सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी ठेकेदार व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेत प्रणालीच्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार दररोज ‘पीएमएस’चा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे दोन आठवड्यांमध्ये बहुतांशी प्रकरणे निकाली निघाले आहेत. केवळ एखाद्या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेला दोष दिला जातो. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक दिला जाणार आहे. त्यावर तक्रार नोंदवल्यास 24 तासांच्या आत उत्तर देणे बंधनकारक राहील. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची एका अधिकार्‍याकडे जबाबदारी राहणार आहे.

या क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास त्याची त्वरित दखल घेतली जाईल. अनावश्यक माहिती मागवल्यास प्रत्यक्ष बोलावून शहानिशा करूनच हा विषय मार्गी लावण्यात येईल. दैनंदिन कामातील समस्यांना यात सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

– भुवनेश्वरी एस. (सीईओ, जिल्हा परिषद)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com