Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे रुपडे पालटणार!

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याची ओळख असणार्‍या जिल्हा लोकल बोर्ड ते जिल्हा परिषदेच्या गौरवशाली इतिहास, परंपरा यांची साक्ष असणार्‍या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे रुपडे पालटणार आहे. जिल्ह्याच्या या ऐतिहासिक वास्तूचे नुतनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून त्याला खास बाब म्हणून मंजुरी मिळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

27 ऑगस्ट 1929 मध्ये या वास्तूची कोनशिला ठेवण्यात आली आणि पुढील चार वर्षात 24 मार्च 1933 मध्ये ही भव्य वास्तू उभी राहिली. बडोदा संस्थानातील कर्तृत्वान संस्थानिक पुरोगामी विचारांचे कल्याणकारी श्रीमंतराजे सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी लोकल बोर्डाला स्वखर्चातून इमारत बांधून दिली होती. या इमारतीमुळे नगरच्या वैभवात भर पडली. आज नगरची ओळख या इमारतीवर असणार्‍या भव्य घड्याळामुळे आहे. याठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य पदाधिकार्‍यांसाठी त्या काळी भव्य दालने, लाकडी जिन्यावर लाल रंगाचे आलीशान गालीचे असायचे. मात्र, भविष्यात ही इमारत अपुरी पडू लागल्याने शेजारी आज अस्तित्वात असणारी चार मजली इमारत बांधण्यात आली.

दरम्यान, या ऐतिहासीक इमारतीचे जनक सयाजीराव खंडेराव गायकवाड आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. 1986 ला तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते व मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण झाले आहे. आता पुतळ्यासह याच ठिकाणी असणार्‍या जिल्हा परिषदेच्या जुन्या अण्णासाहेब शिंदे सभागृहाचे, जुन्या दगडी इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी याठिकाणी भेट देऊन सर्व विभाग दालनाची पाहणी केली आहे. त्यानुसार प्रशासनाने येथील नुतनीकरणासाठी 50 लाखांचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे.

अण्णासाहेब शिंदे सभागृहात भंगार
नगर जिल्हा परिषदेने राज्याला अनेक नेतृत्व दिले. त्या नेतृत्त्वाने जिल्हा परिषदेच्या अण्णासाहेब शिंदे सभागृहात बसून जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकत धोरणात्मक निर्णय घेतले. त्या धोरणात्मक निर्णयाची साक्ष असणारे अण्णासाहेब शिंदे सभागृह आज शेवटच्या घटका मोजत असून त्या सभागृहात भंगार ठेवण्यात आले आहे.

असा ही योगायोग
जिल्हा लोकल बोर्डाच्या लोकार्पण सोहळ्याला बडोदा संस्थानातील कर्तृत्वान संस्थानिक पुरोगामी विचारांचे कल्याणकारी श्रीमंतराजे सयाजीराव गायकवाड यांच्यासह भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील उपस्थित होते. हा मोठा ऐतिहासिक संदर्भ असून यामुळे याठिकाणी दोघांचे अर्धाकृती पुतळे बसविण्यात आलेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या जुन्या ऐतिहासिक इमारतीचा आज वापर होत नसला तरी ही इमारत आजही नगर शहराच्या वैभवात भर घालत आहे. याठिकाणी उन्हाळ्यात वातानुकुलित दालनांपेक्षाही अधिक अल्हादायक गारवा असतो. याठिकाणी तत्कालीन अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी शेवटेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात नवीन इमारत बांधण्यात आली आणि त्यानंतर जुन्या इमारतीकडे दुर्लक्ष झाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!