जि. प. सर्वसाधारण सभेत ‘शिक्षण’, ‘आरोग्य’चे वाभाडे

उडवाउडवीची उत्तरे, कर्मचार्‍यांचा नाकर्तेेपणा, धोकादायक वर्गखोल्यामुळे सदस्य आक्रमक

0

नाशिक । जिल्हा परिषदेच्या जिल्हा बँकेत अडकलेल्या निधीमुळे गर्भवती महिलांच्या पोषण आहारात पडलेला खंड, त्र्यंबक तालुक्यातील वावीहर्ष येथील प्राथमिक शाळेत पोषण आहारात निघालेला मृत उंदीर. आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांची सततची गैरहजेरी.

शाळा सुरू होवून 1 महिना होवूनही विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, पोषण आहार मिळत नाही. झोकादायक इमारती आणि वर्ग खोल्याची झालेली दुरावस्था. या आणि इतर कारणामुळे आज जिल्हा परिषदेची सर्वसाधरण सभा चांगलीच गाजली. शिक्षण आणि आरोग्य विभागाचा कारभार पारदर्शी आणि गतीमान करण्याची मागणी यावेळी उपस्थित सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज येथील रावसाहेब थोरात सभागृहात जि. प. अध्यक्षा शितल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रसंगी उपाध्यक्षा नयना गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, बांधकाम सभापती मनिषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारस्कर उपस्थित होत्या.

सभा सुरू होताच उपस्थित सदस्यांनी सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतांना रुपांजली माळेकर यांनी जिल्हा बँकेत पैसे अडकल्याने अंगवाड्याच्या माध्यमातून गर्भवती महिलांना दिला जाणारा पोषण आहार बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. गर्भवती महिलांच्या पोषण आहारात खंड पडला तर कुपोषण वाढण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. यावर उत्तर देतांना गरजेच्या योजनांसाठी जिल्हा बँक 5 ते 7 कोटी रुपये त्वरीत उपलब्ध करून देणार असल्याची सांगीतले. यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी जिल्ह्यातील मिनी अंगणवाड्याचे रुपांतर अंगणवाडीत करण्याचा ठराव मांडला.

पशुसंवर्धन विभागाचा कारभारावरही सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. पशुधनाला मान्सूनपूर्व केले जाणारे लसीकरण केवळ 15 टक्केच पूर्ण झाले असल्याचे सदस्य निलेश केदार सभागृहाच्या लक्षात आणून दिले. बर्‍याच वेळा पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात. पशुआरोग्यकेंद्र ग्रामिण भागात असले तरी आरोग्य अधिकारी शहरी भागात निवास करता. परिणामी जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने ते दगवतात.

आरोग्यकेंद्रावर निवास न करणार्‍या अधिकार्‍यांचा घरभत्ता बंद करण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षण विभागावर चर्चा सुरू होताच बाळासाहेब शिरसागर व इतर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शाळा सुरू होवून 1 महिना झाला. मात्र अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व पोषण आहार दिला जात नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी यांनी गणवेशासाठी विद्यार्थी व आईचे बँकेत संयुक्त खाते सुरू करून त्यावर 400 रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

मात्र खाते उघडण्यासाठी 500 रुपये लागतात, त्यामुळे अनेकजन खाते उघडत नसल्याचे सदस्यांनी निर्दशनास आणून दिले. यावर तोडगा काढण्यासाठी डॉ. कुंभार्डे नवीन खाते न उघडता पूर्वीच्या खात्यावरच गणवेशाची रक्कम जमा करण्याबाबतचा ठराव मांडला. जिल्हाभरात अनेक वर्गखोल्या ब्रिटीश कालीन आहे. त्यांचा कार्यकाळा संपला असून त्या धोकादायक बनल्या आहे. असे असतांना केवळ 350 खोल्या धोकादायक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते, यावर अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवला.

धोकादायक खोल्यामुळे काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. गेल्या 2 वर्षापासून एकाही ठिकाणी नैसर्गीक वर्गवाढ केलेली नाही. शिक्षण विभागाचा प्रवास संथ गतीने असून अनेक पदे रिक्त आहेत. तसेच जिल्ह्यातील 238 शाळांमध्ये वीजपुरवठा होत नाही अशा ठिकाणी सौरउर्जा यंत्र देण्याची मागणी भारती पवार यांनी केली.

आरोग्य विभागातील कर्चचारी नेहमी गैरहजर असतात. अनेक पदे रिक्त असून त्यामुळे इतर कर्मचार्‍यावरील कामाचा बोजा वाढतो. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात असा आरोप काही सदस्यांनी केला. तर आरोग्य अधिकार्‍याकडून अवमान केला जात असल्याचा आरोप करून सदस्य हरदास लोहकरे यांनी अध्यक्षासमोर ठाण मांडले.

LEAVE A REPLY

*