झरेकाठीचा तरुण चणेगाव बंधार्‍यात बुडाला

0
चणेगाव (वार्ताहर)-प्रवरा नदीला सध्या प्रचंड पाणी असून संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील तरुण चणेगाव बंधार्‍यात बुडाल्याची घटना बुधवारी घडली. सदर तरुणाचा शोध घेण्याचे कार्य उशीरापर्यंत सुरु होते.
झरेकाठी येथील इंदिरानगर येथे राहणारा अजय भिमा शिंदे (वय 20) हा त्याच्या मित्रांसमवेत काल बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चणेगाव येथील वसंत बंधार्‍यावर गेले होते. नदीपात्रात मासे धरण्यासाटी तो पूर्वेकडून बंधार्‍याच्या दोन नंबर मोरीजवळ गेला. त्यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला.
वाहत्या पाण्यात पडल्याने तो वाहत गेला. त्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून मुकेश पवार, गोकुळ माळी, अनिल बर्डे, संतोष बर्डे यांनी अजय यास वाचविण्यासाठी नदीत उड्या मारल्या. परंतु बंधार्‍यालगतच्या उसळत्या पाण्याचा प्रवाहाचा वेग व खोल असलेली पाण्याची पातळी यामुळे अजय हाती लागला नाही. ही घटना परिसरात समजल्यानंतर ग्रामस्थांनी बंधार्‍याजवळ गर्दी केली. झरेकाठीचे पोलीस पाटील सुदाम वाणी, अशोक वाणी, अनिल चव्हाण, मधुकर वाणी, संजय वाणी, धानोरेचे पोलीस पाटील रंगनाथ दिघे आदिंनी अजय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही.

अजय याचे कुटुंब मोलमजुरी करुन चरितार्थ चालविते. घटनेच्या दिवशी कामावरुन सुट्टी असल्याने तो या ठिकाणी आला होता. आणि याचवेळी काळाने त्याच्यावर घाला घातला. घटना घडल्यानंतर डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे कर्मचारी घटनास्थळी आले त्यांनी बंधार्‍याच्या फळ्या टाकून प्रवाहाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजयचा शोध घेणे सोपे होईल. घटनास्थळी राहुरीचे तहसिलदार अनिल दौंड, सात्रळचे सर्कल बी. एल. वडितके, सोनगावचे तलाठी एम. टी. राहाणे हेही हजर झाले. ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणा अजय याचा उशीरापर्यंत शोध घेत होते.

LEAVE A REPLY

*