पुरस्कार जाहीर होण्याआधीच सत्कार समारंभ !

  0

  जिल्हा परिषद : आदर्श शेतकरी-गोपालक पुरस्काराची कहाणी

  अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या आदर्श शेतकरी आणि गोपालक पुरस्काराला दोन वर्षांपासून मुहूर्त मिळालेला नाही. दोन वर्षांत तीन वेळा पुरस्कार वितरण समारंभ निश्‍चित करून तो रद्द करण्याची नामुश्की जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या आदर्श शेतकरी आणि पशुपालक यांची यादी प्रशासनाकडे मागितली असता अद्याप यादी अंतिम झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नगर तालुक्यात एका गावात चक्क पुरस्कार जाहीर झालेला नसताना एका गोपालकाचा जिल्हा परिषदेच्या आदर्श गोपालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कारही करण्यात आला आहे.

  जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्‍या आदर्श शेतकरी व पशुपालक पुरस्कारांना दोन वर्षांपासून खोडा आहे. कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग या पुरस्कारांच्या कार्यक्रमासाठी तयारी करूनही ऐनवेळी माशी शिंकत असल्याने पुरस्कार रद्द करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. चालू आठवड्यात 10 तारखेला या पुरस्कारांचे वितरण होणार होते. मात्र, महागाईच्या मुद्यावर काँग्रेस पक्षाच्यावतीने देश बंदचे आयोजन केल्याने पुन्हा तिसर्‍यांदा हा पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्याची वेळ आली. दरम्यान, सोमवारचा सोहळा रद्द झाला असला तरी अद्याप पुरस्कारांची यादी अंतिम झाली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

  पुरस्कारार्थी यादी अंतिम झालेली नसताना पुरस्कार वितरणाचे कसे आयोजन करता येऊ शकते, या प्रश्‍नावर दोन्ही विभागाच्यावतीने तोंडावर बोट ठेवण्यात आले. यामुळे या पुरस्कारांचे गूढ वाढले आहे. आता नव्याने पुरस्कारासाठी कधी मुहूर्त लागणार याकडे जिल्ह्यातील आदर्श शेतकरी आणि पशुपालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यादी अंतिम होऊन जाहीर झालेली नसताना नगर तालुक्यात मात्र, आदर्श पशुपालकांचा सत्कार सुरू झाला आहे. यामुळे परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फुटीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या पुरस्कारांची यादी फुटली असल्याची शंका आता उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत जि.प. प्रशासनाने काही बोलण्यास नाकार दिला.

  तीन वर्षांपूर्वी आदर्श शेतकरी आणि पशुपालक पुरस्कारांच्या वेळी घोळ झाला होता. त्यावेळी या पुरस्कारामध्ये पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरून ऐनवेळी काहींची नावे बळजबरीने घुसवली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुरस्कार वितरणापूर्वी आणि वितरणानंतर पुरस्कारार्थीची यादी माध्यमापासून लपवली होती. त्याची पुनरावृत्ती यंदा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  LEAVE A REPLY

  *