शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तरूण एकवटले

0

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

पारनेर (प्रतिनिधी) – विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी विक्रमसिंह कळमकर व गुलाबराव करंजुले यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला 50 टक्के हमीभाव देण्यात यावा, शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा बेलवंडी फाटा येथे तरुण शेतकरी, रस्त्यावर उतरले होते. सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍यांनी रास्ता रोको करुन शहराचा भाजीपाला, दूध अडविण्यात आला होता. यामुळे पारनेर, सुपा पोलिसांनी रस्ता लुटीच्या नावाखाली शेतकर्‍यांवर वेगवेगळ्या कलमानुसार खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
अगोदरच कर्जाच्या ओझ्याने शेतकरी दबला असताना, सरकारच्या दडपशाहीने शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शेतकर्‍यांवरील हे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष वसंत साठे, उपाध्यक्ष विशाल करंजुले शरद पवळे, दीपक खंदारे, संतोष यादव, अप्पासाहेब साठे यांच्या सह्या आहेत.

शेतकरी अण्णा हजारेंना घालणार साकडे
शेतकर्‍यांच्या रास्त मागण्यांकडे सरकारने सतत दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍यांकडून रास्ता रोको करून शहराचा भाजीपाला, दूध अडविण्यात आला होते. असे जनआंदोलन सुरू असताना पारनेर सुपा पोलिसांनी रस्ता लुटीच्या नावाखाली तरुण शेतकर्‍यांवर वेगवेगळ्या कलमानुसार खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या शेतकर्‍यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटून आपली कैफियत मांडणार असल्याचे हभप गुलाबराव करंजुले व उपसरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*