तरूण शेतकर्‍याची बिबट्याशी झुंज

0

दोन मुलांना वाचविण्यात यश, संगमनेर तालुक्यातील थरार

संगमनेर (प्रतिनिधी) -शेतात खेळत असलेल्या दोन लहान मुलांना आपले भक्ष्य बनविण्याच्या बेतात असलेल्या बिबट्याशी झुंज देत एका तरुण शेतकर्‍याने या मुलांचे प्राण वाचविले. ही घटना तालुक्यातील आंबी-खालसा येथील गणपीर दरबार मळ्यात दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दीपक बर्डे हा जखमी झाला आहे.

डोंगरामध्ये वसलेला गणपीर-दरा शंभर वस्तीचा छोटा मळा आहे. दीपक हा आपल्या बहिणीने वाट्याने केलेल्या शेतात काम करण्यासाठी गेला होता. दुपारी दोन वाजता जेवण झाल्यावर दीपक हा जवळच असलेल्या मक्याच्या शेतात लघुशंकेसाठी गेला. त्यावेळेस मक्याच्या शेताच्या बाजूला शेतमालक ईसुफ शेख यांची लहान मुलगी तर दीपकचा भाचा पंकज पवार हे खेळत होते.
मक्याच्या शेतातून आवाज आल्याने दीपकला वाटले की कुत्र असेल. दीपकने हाड म्हणताच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. पहिल्या हल्ल्यात दीपकच्या पायाला जखम झाली. बिबट्याने पुन्हा दीपकच्या चेहर्‍यावर झेप घेतली. यावेळी दीपकच्या छातीवर बिबट्याने जखम केली. मात्र दीपकने उजव्या हातने बिबट्याला जोरात मारले असता बिबट्याने तेथून पळ काढला.
या हल्ल्यात दीपक हा गंभीर जखमी झाला असून शेतात खेळणार्‍या मुलांचा जीव मात्र वाचला आहे. दुपारी झालेल्या या हल्ल्याने गणपीर दरबार मळ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गंभीर जखमी झालेल्या दीपक बर्डे यांना घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रसंगी वनविभागाचे कर्मचारी राजश्री दिघे, सुखदेव गाडेकर यांनी दीपकची भेट घेतली.

LEAVE A REPLY

*