Friday, May 3, 2024
Homeनगरतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर l तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील गुणोरे गावातील ४५ वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतामधील लिंबाच्या झाडाला दोरखंडाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघड झाली. घटनास्थळी निघोज दुरक्षेत्राचे पोलिस दाखल झाले असून पंचनामा करून ते आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रेय किसन खोसे (वय ४५ रा. गुणौरे, ता. पारनेर) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकयाचे नाव आहे. बुधवारी पहाटे त्यांनी त्यांच्या गुणौरे येथील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुणोरे परीसरातील शेतीसाठी सध्या पहाटेच्या सुमारास विजपुरवठा सुरू करण्यात येतो. खोसे यांच्या घराशेजारील शेतकरी सकाळी कांद्याला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असता लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दत्तात्रेय यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी दत्तात्रेय खोसे यांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांना त्याबाबत माहीती दिल्यानंतर घटनास्थळी नागरीक जमा झाले. पोलिसांना माहीती देण्यात आल्यानंतर निघोज दुरक्षेत्राचे पोलिसही तेथे दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आता दत्तात्रेय यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार शेतकरी असलेले दत्तात्रेय हे पिक अप चालक म्हणूनही काम करीत होते. त्यांना कशाची चिंता अथवा त्यांचे कोणाशी भांडणही नव्हते. आर्थिक विवंचनाही नसल्याची प्राथमिक माहीती आहे, परंतू त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दत्तात्रेय यांनी आत्महत्या का केली असावी? याविषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत. मयत दत्तात्रेय यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परीवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या