Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नांदुर्खीच्या कालव्यात आढळला कोर्‍हाळेच्या तरुणाचा मृतदेह

Share
नांदुर्खी (वार्ताहर) –  राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ असलेल्या गोदावरी उजव्या कालव्यात कोर्‍हाळे येथील हॉटेल चालक तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपात असून त्याला मारहाण करून ठार करण्यात आले असल्याचा संशय कोर्‍हाळे येथील त्यांचे नातेवाईक व मित्रांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल बुधवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथे श्रीकृष्ण मंदिराजवळील गोदावरी उजवा कालव्याजवळ दशक्रियाविधीचा कार्यक्रम सुरू होता. त्या दरम्यान काही जणांनी मृतदेह पाहिला. हा मृतदेह मोटारसायकलच्या खाली अडकलेला होता. गावातील काही लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच काही लोकांनी हा मृतदेह ओळखलाही होता.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोटारसायकल व मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर दशक्रियाविधीसाठी आलेल्या काही जणांनी मृतदेहाची ओळख सांगितली. सदरचा तरुण हा कोर्‍हाळे येथील असून त्याचे नाव सुनील अशोक मुर्तडक आहे. तो एक हॉटेल व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सुनील मुर्तडकच्या डोक्याला व चेहर्‍यावर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे या मृतदेहाचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यामुळे सदरचे शवविच्छेदन हे इनकॅमेरा करण्यात आले.
याप्रकरणी नांदुर्खी खुर्दचे पोलीस पाटील सोमनाथ वाणी व नांदुर्खी बुद्रुकचे पोलीस पाटील लक्ष्मण कोळगे या दोघांनी याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तो मोटारसायकलवरुन पाण्यात पडला की त्याचा घातपात करून कालव्यात टाकले याबाबत चर्चा सुरू होती.
सुनील मुर्तडक याचे कोर्‍हाळे येथे हॉटेल असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली व त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा संशय कोर्‍हाळे येथील त्याच्या नातेवाईक व मित्रांनी व्यक्त केला आहे. सुनीलच्या डोक्याला व चेहर्‍यावर जखमा आढळून आल्या असून मोटारसायकलची चावी मोटारसायकललाच आहे त्याच स्थितीत आढळून आली आहे. त्यामुळे हा घातपाताचा संशय आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून यातील आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. त्यानंतरच तपासाला दिशा मिळणार आहे. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहावी लागणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सुनील मुर्तडक हा अविवाहीत असून त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!