नाशिककर योग प्रशिक्षिका करणार सलग १०० तासांचा योग-विक्रम

नाशिकचे नाव जागतिक स्तरावर नेण्याचा प्रज्ञा पाटील यांचा मानस

0

नाशिक, ता. १४ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्व जगभर बोलबाला होत असतानाच नाशिकमधील योग प्रशिक्षकेची महती लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिककर योग प्रशिक्षिका योगाचार्च प्रज्ञा पाटील या ‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन फिमेल’ हा जागतिक विक्रम नोंदविण्याच्या तयारीत आहे.

येत्या १६ ते २० जून दरम्यान इगतपुरी येथील ग्रँड गार्डन रेसॉर्ट येथे त्या सलग १०० तास न झोपता योगासने करणार आहेत.

दिनांक १६ जूनला पहाटे साडेचार पासून त्या मॅरेथॉन योगाला सुरुवात होऊन २० तारखेला सकाळी साडेआठ वाजता बरोबर १०० तासांनी त्याची सांगता होईल. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

या काळात त्या केवळ द्रवपदार्थांचे सेवन करणार आहेत. या आधीचा विक्रम ५७ तासांचा असून तमिळनाडूच्या के.पी.रचना यांच्या नावे होता.

भारतीय योगशास्त्र हे जगातील एकमेव असे शास्त्र आहे की ज्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला आहे, त्यामुळे या विक्रमामुळे योगशास्त्र आणि नाशिकचे नाव जागतिक स्तरावर जाऊन, आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे महत्व अधोरेखीत करण्याचा उद्देश सफल होणार असल्याचे प्रज्ञा पाटील यांनी देशदूला सांगितले.

तसेच आपण १८ तारखेलाच आधीचा विक्रम मोडीत काढू असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

यासंदर्भात त्या म्हणाल्या पतंजली योगसूत्रानुसार स्थिरसुखमासन या आसनाचे सादरीकरण या काळात करणार आहे. या आसनात जास्तीत जास्त कालावधीसाठी आसन स्थिर ठेवून श्वसनाच्या माध्यमातून संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रीत करायचे असते. त्यासाठी त्यांनी सरावही केला आहे. आधी या विक्रमासाठी घरून, मुलांनीही पाठिंबा दिल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

उद्योजिका असलेल्या प्रज्ञा पाटील मुळच्या रावेर, जि. जळगाव येथील असून उद्योग व्यवसायानिमित्त त्या नाशिकला स्थायिक झाल्या.

पावडर कोटींग आणि फॅब्रिकेशनच्या उद्योगात त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर विविध पुरस्कारही मिळवले आहेत. एका आजारपणाचे निमित्त होऊन त्या योगशास्त्राकडे वळाल्या आणि त्यानंतर त्यांना योगाची आवड निर्माण झाली.

पुढे त्यांनी या शास्त्रात एम्ए देखिल केले. सध्या त्या पीएचडी करत आहेत. योगगुरू विश्वासराव मंडलीक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असून गिनेज रेकॉर्डसाठी आपल्या गुरुंनी प्रोत्साहन दिल्याचेही त्या नम्रपणे नमूद करतात.

योग शिकण्याच्या निमित्ताने योगाकडे वळलेल्या प्रज्ञा पाटील त्यात पारंगत झाल्या असून त्या उत्तम योग प्रशिक्षिकाही आहेत. योगासाठी २०१६ मध्ये आपला उद्योग दुसऱ्याला चालवायला देऊन सध्या पूर्णवेळ योगासाठी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*