कोपर्डीच्या आरोपींना तात्काळ येरवड्याला पाठवा

0

मुख्यमंत्र्याचा स्वीय सहाय्यक, पोलीस महासंचालक आणि एसपींच्या नावे तोतया फोन

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी अत्याचार व खून खटल्याचा निकाल लागल्यानंतर एका तोतया व्यक्तीने मी मुख्यमंत्री यांचा स्वीय सहाय्यक (पीए), पोलीस महासंचालक, एसपी बोलतोय असे तीन वेळा फोन करत तोतयागिरी केली. कोपर्डीच्या तिनही आरोपींना अर्ध्या तासाच्या आत पुण्यातील येरवडा कारागृहात पाठवा. नागपूरला पाठवू नये, असे सांगत कारागृहातील पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहुचर्चीत कोपर्डी खटल्याच बुधवारी (दि.29) रोजी सकाळी निकाल जाहीर झाला. यात आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर आरोपींना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी नगरच्या सबजले व नंतर रौत्री 9 वाजून 30 मिनिटांनी पुण्याच्या येरवाडा कारागृहात नेण्यात आले. बुधवारी दरम्यानच्या काळात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका मोबाईल नंबरहुन नगरच्या सबजेलमध्ये फोन आला.
कोपर्डीच्या तिनही आरोपींना सबजेलमध्ये ठेऊ नये. अर्ध्या तासाच्या आत येरवडा कारागृहात हलविण्यात यावे. तसेच नागपूर कारागृहात देखील पाठवू नयेत, असा आदेश मुखमंत्री यांचे आहेत. मी त्यांचा खाजगी पीए कुलकर्णी बोलत आहे, असे सांगून फोन कट झाला. त्यानंतर 7 वाजण्याच्या सुमारास पुन्हा फोन आला. मी एसीपी बोलतो आहे. कोपर्डीतील आरोपी कोर्टातून निघाले आहेत. त्यांना सबजेल येथे न पाठविता येरवडा कारागृहात हलविण्यात यावे, असे म्हणत फोन ठेवण्यात आला. यामुळे हा फोन खरोखर वरिष्ठांचाच आहे का? याची चौकशी सबजेल मधील अधिकार्‍यांकडून सुरू झाली.
दरम्यान, फोनबाबत तपास सुरू असतांनाच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुन्हा फोन वाजला. समोरील व्यक्ती मी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्ये बोलत आहे. कोपर्डीच्या तिनही आरोपींना तात्काळ येरवाडा जेलकडे वर्ग करा. येरवाड्यात ते सुरक्षीत राहतील, असे म्हणून संबंधीत अनोळखी व्यक्तीने फोन बंद केला. या फोनबाबात कारागृह पोलीस अधीक्षक नागनाथ सावंत यांनी खात्री केली. हे सर्व फोनकॉल बनावट असल्याची खात्री पटल्यानंतर, सावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन 9146186419 या क्रमांकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना शिरदावडे करीत आहेत.

अनुचित प्रकार टळला
कोपर्डीच्या निकालाच्या दिवशी अशा प्रकारचा फोन आले होते. त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांनी केली. म्हणून पुढील कोणत्याही प्रसंगांना समोरे जावे लागले नाही. आरोपींना सबजेलमध्ये आणून जेवण देऊन रेकॉर्ड पूर्ण करून पुण्याला सुरक्षीत हलविण्यात आले. बोगस फोनकॉलबाबत पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
– शामकांत शेडगे (तुरूंग अधिकारी).

LEAVE A REPLY

*