नाशिक । विठ्ठल वाळके : विषमुक्त शेतीसाठी ( कृषी )

0

कितीही औद्योगिक प्रगती झाली, नवीन विकासाच्या वाटा आल्या तरी माणूस यंत्र खाणार आहे का? शेतकर्‍याने शेतीच पिकवायची नाही असे ठरवले तर? पण हाडाचा शेतकरी स्वस्थ बसूच शकत नाही. उलट वेगवेगळे प्रयोग करून प्रत्येक नागरिकाने विषमुक्त अन्न खावे यासाठी धडपड करणारे शेतकरीही आहेत. येवला तालुक्यातील धूळगाव येथील विठ्ठल सोपान वाळके यांचे नाव इथे अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या कांदा व द्राक्ष या पिकांची निर्यातही होते आहे.

                                         कधी राहून उपाशी, भूक त्याची भागवली,
                                   हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली’
संत गाडगेबाबा यांची ही रचना वाचून आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव होते. एकीकडे ग्रामीण भागातल्या तरुणाला शहरी भागातला झगमगाट खुणावतोय; पण माझ्यासारख्या काहीजणांची मातीशी घट्ट जुळलेली नाळ तुटता तुटत नाही. दहावीपर्यंतच शिक्षण झालेले असले तरी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण याद्वारे विषमुक्त शेतीबरोबरच इतरांनाही त्याचे महत्त्व समजावून सांगतोय.

त्यासाठी ‘माऊली कृषी विज्ञान केंद्रा’ची स्थापना केली आहे. एकदा आईला घेऊन डॉक्टरांकडे तपासणीला गेलो असताना सेंद्रिय शेती किती महत्त्वाची आहे, हे माझ्या लक्षात आले. कारण डॉक्टरांनी सांगितले, ‘शंभर रुग्ण तपासले तरी त्यातील काही जणांना किडनीचे आजार असतात. शिवाय त्यातील दोन-तीन जणांना कर्करोगाचे निदान होतेच. हे खूप गंभीर आहे आणि याला कारण शेतात होणारा रासायनिक खते आणि कीडनाशकांचा भडीमार.

’ त्यावेळी मी विचार केला हे आजार माझ्याही घरापर्यंत पोहोचू शकतात आणि मी स्वतःत बदल करायचे ठरवले. इतरांना बदलायचे ठरवले. सेंद्रिय-जैविक खतांच्या वापरातून गावात क्रांती करायचे ठरवले. उदाहरणार्थ, वांग्याच्या पिकावर आंतरप्रवाही औषध फवारले जाते. दुसर्‍या दिवशी ही वांगी बाजारात येतात आणि आपण भाजी करून खाल्ल्यावर त्यावरील विषयुक्त घटक माणसांच्या पोटात जातात. हे योग्य नाही याची जाणीव झाली.

येवला तालुक्यात धूळगाव इथे माझी वडिलोपार्जित 6 एकर शेती आहे. 2011 यावर्षी तिथे शेततळे बांधले. पालखेड डावा कालव्यापासून 4 किलोमीटर अंतराची पाईपलाईन आणली. पाणी मुबलक आहे. त्यामुळे बारमाही पिके घेता येतात. दहावीनंतर मी पूर्णवेळ घरच्या शेतीत काम करू लागलो. गेली दहा वर्षे पारंपरिक शेती न करता त्यात आधुनिकता आणलीय. 6 एकर बागेत 1 एकर मिरची, 2 एकर मका, 2 एकर द्राक्षबाग आहे. मक्याचे पीक काढले की सप्टेंबरमध्ये लाल कांद्याची रोपे घरीच तयार करून त्याची लागवड ऑक्टोबरमध्ये केली जाते.

कांद्याचे रोप तयार होण्यास 60 दिवसांचा तर कांदा तयार व्हायला शंभर ते 110 दिवसांचा कालावधी लागतो. उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिकेला सप्टेंबरमध्ये सुरुवात होते. कांद्याला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनची सुविधा केली आहे. जैविक खत वापरले जाते. तणनियंत्रणासाठी सध्या तणनाशक वापरले जाते; पण आता त्यावरही पर्याय शोधतोय. ते यशस्वी झाल्यास तणनाशक वापरावे लागणार नाही. एखादी कीड मोठ्या प्रमाणावर आली तरच फवारणी केली जाते. सेंद्रिय कांद्याची टिकवण क्षमता जास्त असते. इतर कांद्याच्या तुलनेत तो छोटा असू शकतो. माझा कांदा लासलगावला जातो. तिथून दुबई, मलेशिया व सिंगापूरला निर्यात होतो. काही लोकल मार्केटलाही येतो.

द्राक्षेही गेली दोन वर्षे पिंपळगाव बसवंत येथील डेक्कन एक्स्पोर्टमार्फत दुबई व बांगलादेशला जातात. त्यामध्ये रसायनाचा एक अंशही चालत नाही. द्राक्षे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. माझ्या 5 गायी आहेत. त्यांच्यासाठी सुसज्ज गोठा आहे. त्यांच्या शेणापासून बायोगॅस तयार केलाय. त्यातून मिळणार्‍या उत्तम प्रकारच्या स्लरीचा गांडूळ प्रकल्पात उपयोग होतो. ते खत आम्ही शेतीसाठी वापरतो. हा जैविक खताचा प्रयोग आणि त्यातून मिळणारे उच्च प्रतीचे उत्पादन पाहून हा प्रयोग आम्ही गावात इतरांनाही सांगितला.

तसेच त्याचा फायदा सांगितल्यावर अनेकजण माझ्याप्रमाणे जैविक खताचा प्रयोग करू लागले आहेत. शेती विषमुक्त होण्याची चळवळ गावात सुरू झाली आहे. आमच्या शेतकरी गटाने आता गावात आठवडी बाजार सुरू केला असून त्यात आम्ही सेंद्रिय उत्पादनांचा वेगळा स्टॉल लावतो आहोत. बाहेरगावचे लोकही आमच्याकडे येऊ लागले आहेत. भविष्यात आणखी वेगळे प्रयोग, खरा सेंद्रिय माल शहरापर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की, शासनाने पुढे येऊन शेतमालाची प्रतवारी करायला हवी. तसेच नागरिकांना सहज शेतमालाचे प्रमाणिकरण करता येण्यासाठी अपेडासारख्या संस्थांनी पुढे यायला हवे. शेतकरी तरुणांनीही नैसर्गिक किंवा इतर आपत्तींवर मात करून काळ्या आईला जगवले पाहिजे. तिच्यात रसायन ओतून नव्हे तर तिची उच्च दर्जाच्या नैसर्गिक खतांनी मशागत करून! तरच तिच्यासह आपण निरोगी आयुष्य जगू शकू. माझी ही चळवळ माझ्या गावात सुरू केलीय. सर्वच कृषिबांधवांनी ती राबवायला हवी, असे मला वाटते.

शब्दांकन :  ( शिल्पा दातार-जोशी ) 

पुढील मुलाखत – भूषण पगार ( कृषी )

LEAVE A REPLY

*