तांत्रिक अडचणीचे 40 अभ्यासक्रम बंद; मुक्त विद्यापीठ कुलगुरु ई.वायुनंदन यांची माहिती

0

नाशिक । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कौशल्याधिष्ठीत शिक्षण देते. मुक्त विद्यापीठाने तांत्रिक अडचणी असलेल्या वैद्यकीय तंत्रशिक्षण आणि वास्तुविशारद आदी शाखांचे 40 अभ्सासक्रम बंद केले आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जे अभ्यासक्रम पारंपारिक विद्यापीठांकडे नाहीत त्यांना मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम देणे आणि जे अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाकडे नाहीत ते पारंपारिक विद्यापीठाकडून घेणे या धोरणाने अभ्यासक्रमांची अदलाबदल करण्याचे प्रस्तावित आहे, असे सांगून विद्यापीठाकडून शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, प्रशासकीय कामकाज यातील बदल याची माहिती कुलगुरु वायुनंदन यांनी दिली. विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे ऑनलाइन प्रवेश सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ.प्रकाश अतकरे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे आदी उपस्थित होते.

मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाल्याचे सांगताना डॉ. वायुनंदन म्हणाले की, 107 अभ्यासक्रमांसाठी चालू शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश दिले जात आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आहे. मात्र मुक्त विद्यापीठाने कोणत्याही अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचे जाहीर केलेले नाही.

युजीसीच्या निकषात बसत नसणारे आणि तांत्रिकदृष्टया अडचणीचे ठरणारे 40 अभ्यासक्रम विद्यापीठाने बंद केले आहेत. इतर विद्यापीठाच्या आणि मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सारखेपणा येणार नाही, याची खबरदारी विद्यापीठाकडून घेण्यात येणार असल्याचे वायुनंदन यांनी म्हणाले.

मुक्त विद्यापीठात चालू शैक्षणिक सत्रापासून एमसीए या पदव्युत्तर संगणकीय अभ्यासक्रमांची सुरूवात होणार आहे. त्याचा लाभ बीसीए झालेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यापीठाचे एमएसडब्ल्यू, बीएसडब्ल्यू हे अभ्सासक्रम अद्यावत करण्यात येणार आहेत. मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांचा समन्वय घडवून आणणारे अभ्यासक्रम सुरु करण्याचे नियोजन असल्याचे डॉ.वायुनंदन यांनी म्हटले.

मुक्त विद्यापीठ अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने मुंबई विद्यापीठानेही मुक्त विद्यापीठाच्या मदतीने आपले अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवण्याचे कार्य हाती घेतले आहे. विद्यापीठाच्या 18 हजार अभ्यास केंद्रांना अद्यावत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठ एक अ‍ॅप तयार करत आहे. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या बढतीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरु केली आहे. मुक्त विद्यापीठ शैक्षणिक कामकाजाबरोबरच निसर्ग संवर्धन, कर्मचार्‍यांचे हित जपणारे उपक्रम राबवते. विद्यापीठ परिसरातील उद्यान उत्कृष्टपणे विकसित करण्यात आल्याचे वायुनंदन यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती विशद केली. परीक्षा नियंत्रक डॉ.अर्जुन घोटुळे यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कोणत्याही माहिती तंत्रज्ञान संस्थेची विद्यापीठाने मदत घेतलेली नाही तर अभ्यास केंद्र आणि विभागीय कार्यालयात अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे सांगितले.
विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. प्रकाश अतकरे यांनी विद्यार्थ्याची गैरसोय दूर करण्यासाठी आणि वेळापत्रक पाळण्यासाठी विभाग कार्यरत असल्याचे नमूद केले. जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

*