चुकीचे औषध दिल्याने डाळिंबाचे 20 लाखांचे नुकसान

0
लोणी (वार्ताहर) – लोणी बुद्रुक विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे यांना लोणीतीलच आनंद कृषिसेवा केंद्र चालकाने डाळिंबासाठी चुकीचे औषध दिल्याने त्यांच्या पाच एकर डाळिंबाची पाने व फळ गळती झाली.त्यामुळे या शेतकर्‍याने कृषी विभागाकडे तक्रार केली असून त्यात 20 लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
चांगदेव विखे यांनी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व हसनापूर येथे पाच एकर डाळिंब लागवड केलेली आहे. झाडांना चांगली फळे लागली आणि ते काढणीसाठी काही दिवस बाकी असताना फळांना चांगला रंग यावा म्हणून त्यांनी लोणी येथील त्यांचे नेहमीचे दुकान आनंद कृषिसेवा केंद्रात जाऊन इथ्रील व झिरो झिरो 52 ही औषधे घेतली.
विखे यांच्या तक्रारीनुसार त्यांनी दुकानदाराशी याबाबत चर्चा केली होती व रंग येण्यासाठी औषध देण्यास सांगितले होते. दुकानदाराने दिलेले औषध फवारल्यानंतर फळांना रंग तर आलाच नाही पण झाडांची पाने गळती व फळांची गळती सुरू झाली.
पाच एकरांतील अतिशय चांगली फळधारणा झालेली असताना फळबाग काढण्याच्या अवस्थेत असताना फक्त नुकसान होताना बघण्यापलीकडे काहीच करता आले नाही. चांगदेव विखे हे गावातील एका संस्थेचे प्रमुख असल्याने दुकानदार त्यांचा सहानुभूतीने विचार करेल असे वाटत असताना तसे मात्र घडले नाही.
दुकानदाराने यात माझी काहीच चूक नसल्याचे सांगत हात वर केल्याने चांगदेव विखे यांनी थेट कृषी अधिकार्‍यांची भेट घेऊन दुकानदाराविरुद्ध तक्रार दिली. राहात्याचे तालुका कृषी अधिकारी, लोणीचे कृषी अधिकारी यांनी लोणी व हसनापूर येथील शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.
दरम्यान चांगदेव विखे यांनी तक्रारीची प्रत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, कृषी सचिव, कृषी आयुक्त, विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठवून न्याय आणि भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

दुकानदाराला नोटीस बजावणार : कृषी अधिकारी गायकवाड 

या गंभीर घटनेबाबत तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड यांना विचारले असता त्यांनी तक्रारीत तथ्य असल्याचे सांगितले. आम्ही शेतात जाऊन पाहणी केली असून पंचनामा केला आहे. दुकानदाराला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी माझे अनेक वर्षांपासून ग्राहक आहेत. त्यांनी कशासाठी औषध पाहिजे हे मला ना सांगता फक्त ही औषधे द्या असे म्हणून सांगितल्याने मी दिली, यात माझी काहीच चूक नाही, तरीही मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण शेतकर्‍याला मदत करू असे स्पष्ट केले. तरीही दुकानदाराला नोटीस बजावणार असून काय कायदेशीर कारवाई करता येईल याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*