लेखी आश्‍वासनानंतर विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

0

विद्यार्थ्यांसमोर आदिवासी प्रकल्प अधिकारी नरमले

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील पाइपलाईन रोडवरील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दोन दिवस अन्नत्याग केले. अखेर रविवारी रात्री उशिरा आदिवासी प्रकल्प अधिकारी एम. एस. ठुबे यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या हट्टापायी आंदोलन रात्री उशीरा पर्यंत चालूच होते.
आंदोलनात राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, निखील वारे, लतिका पवार तसेच चर्मकार उठाव संघाचे अशोक कानडे, गौतम सातपुते, प्रकाश पोटे, सुनील केदार, विलास भारमळ आदींनी सहभागी होऊन, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
रविवारी रात्री आदिवासी प्रकल्प अधिकारी एम.एस. ठुबे नाशिकवरून नगरला आले. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी सर्व प्रश्‍नांवर चर्चा केली. प्रश्‍नांवर तोडगा निघत नसल्याने आंदोलन रात्री उशिरा पर्यंत चालू होते. विद्यार्थ्यांनी गृहपालाची तातडीने बदली करण्याचा हट्ट धरला. ठुबे यांनी तडकाफडकी बदली करता येत नसल्याचे स्पष्ट करून, त्यांच्यावर कारवाई प्रक्रीया राबवणार असल्याचे आश्‍वासन दिले.
भोजनासाठी ठेकेदार बदलून नवीन ठेकेदार नेमण्यासाठी ई टेंडर राबविण्याचे किंवा विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाचे पैसे वर्ग करण्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी ठुबे यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनात म्हटले आहे, गृहपाल खेडकर यांच्याबाबत विद्यार्थ्यांच्या गंभीर तक्रार असल्याने वसतिगृहाचे वातावरण शांत रहावे, अयासाठी गृहपाल पदाची पर्यायी व्यवस्था दोन दिवसांत करण्यात येईल.
आयुक्त यांच्या मान्यतेने एक संगणक दोन महिन्यात दिले जाईल. पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करून, भोजन ठेक्याची ई टेंडरी पध्दतीने नव्याने निवीदा काढण्यात येईल. तसेच नवीन प्रशस्त इमारतीसाठी जाहिरात दिली जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

लायब्ररी, संगणक, कॉट व टेबलसाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता असल्याने नवीन इमारत भाडे तत्वावर मिळण्यासाठी तातडीने वृत्तपत्रात जाहिरात देण्याचे आश्‍वासन ठुबे यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या झालेल्या असुविधेबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व वेळकाढूपणामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली असल्याचा उपस्थितांनी निषेध व्यक्त करून, या यंत्रणेत बदल करण्याची मागणी केली.

 

LEAVE A REPLY

*