जागतिक महिला दिन विशेष : ग्रामीण महिला आणि महिला दिन…

jalgaon-digital
5 Min Read

आज ०८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलय? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली (?) असे म्हणायला हरकत नाही.

नेमिची येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण हा उत्सव साजरा करणार, यात काही शंका नाही. शहरात असलेली मुलगी पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभी राहण्यास पात्र ठरत आहे. महानगरातील मुली ही शिक्षण घेऊन सरकारी, खाजगी किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कार्यालयात विविध पदावर काम करतांना दिसत आहेत, शहरातील मुलीं मुलांबरोबर शिक्षण घेऊन त्यांच्या पेक्षाही वरचढ ठरत आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.

शहरातील मुलींचे जीवन चांगले आहे, याचा अर्थ असा नव्हे की, मुली शिक्षणाच्या बाबतीत आता वंचित राहिलेल्या नाहीत. पण जरा शहारावरचा आपला कॅमेरा ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या विकासाकडे फिरविल्यास आपणास अनेक समस्या आणि प्रश्न तेथे दिसून येतात.

शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. एकदम विरुद्ध टोक आहेत. ग्रामीण मुलीवर आज देखील अन्याय होत आहे. ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षण आवश्यक नसून त्यापेक्षा आवश्यक आहे त्यांना घरात स्वयंपाक करता येणे, धुणी-भांडी करता येणे, मुलं बाळांना सांभाळता येणे, घरातील पुरुषांना आनंदी ठेवता येणे, इत्यादी कामे तिला जमलेच पाहिजे.

पण तिला शाळेत जाण्याची किंवा काही नवीन शिकण्याची संधी मात्र दिल्या जात नाही. आज ही ग्रामीण भागात शंभर मुलींमागे सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले पन्नास टक्के आढळतील मात्र पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सापडतात.

ही किती चिंतनीय बाब आहे. मुलींसाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आणि त्या राबविल्या देखील तरी ही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आज ही म्हणावी तेवढी प्रगती नाही, असे का? कारण ग्रामीण भागातील लोक आजही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडमध्ये रुतलेले आहेत.

त्याच्या विरोधात त्यांना वागणे कदापिच जमणार नाही. विज्ञानाच्या आधारे माणूस चंद्रावर गेला पण ग्रामीण भागातील लोकं आहे त्याच ठिकाणी घट्ट बसून आहेत. त्या लोकांचा विकास फक्त शिक्षणाने होते हे सुद्धा एक निर्विवाद सत्य आहे. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकविले जाते. काळजी आणि सुरक्षा या कारणांमुळे मुलींना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पाठविले जात नाही.

यात पालकांची मानसिकता लक्षात घेण्यासारखे आहे. आजच्या विषम वातावरणात कोणत्याही पालकांना असे विचार मनात येणे साहजिक आहे, मात्र त्यासाठी तिला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याची चूक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना कार्यान्वित झाल्यापासून अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलींच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे बहुतांश महिला शिक्षिकानी मत व्यक्त केले.

अशीच काही योजना ग्रामीण भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी शहरात ज्याप्रकारे सोयी सुविधा निर्माण केल्या जातात अश्याच सुविधा ग्रामीण भागात पोहोचविणे आवश्यक आहे. छोटे छोटे काम शिकण्यासाठी त्यांना शहरात येणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या गावांत जाऊन मुलींना स्वयंरोजगाराचे धडे दिल्यास ते स्वतःच्या पायावर नक्की उभे राहतील.

जगात सर्वत्र कायद्याला मान दिला जातो. त्यात खूप शक्ती आहे, याची जाणीव असून देखील महिलांवरील अत्याचार व अन्याय का कमी होत नाही ? एक दिवस सुद्धा असे उजाडत नाही, ज्या दिवशी महिलांवर अन्याय, अत्याचार, अमानुष छळ, किंवा बलात्कार झाले नाही.

पैशाच्या जोरावर श्रीमंत लोकं नाचतात, कायदा हातात घेतात, पैशाच्या बळावर काही ही करायला ते तयार असतात. कधी जर त्यांच्या घरातील महिलांवर असा प्रसंग ओढवला तर तेंव्हा त्यांना कळते की खरोखरच किती वेदना होतात ते ?

आपण दरवर्षी असे दिन उत्सवाप्रमाणे साजरा करतो. काही जुने संकल्प सोडतो तर काही नवीन संकल्प करतो. नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे त्या संकल्पला ही विसरतो. एखाद्या महिलेवर आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर आपण फक्त अरेरे असा खेद व्यक्त करून तोंड जरासे वेडेवाकडे करून निघून जातो किंवा पाहत बसतो.

त्यापलीकडे आपण काही करत नाही. ग्रामीण भागातील लोकांना अनेक गोष्टी मुळात माहिती नसतात म्हणून त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम पहिल्यांदा करणे आवश्यक आहे. माहिती नसल्यामुळे येथील लोकं वर्षनुवर्षे मागासलेले आहेत.

आजच्या या महत्वपूर्ण दिवशी असा संकल्प करू या की, गावातील प्रत्येक तरुणीला स्वयं रोजगार करण्यासाठी मदत कारेन, त्यांना योजनांची माहिती देऊन जागृत करेन आणि मी महिलांवर अत्याचार करू देणार नाही, तिला जे हवं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.

नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *