Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Blog : जागतिक रेडिओ दिनविशेष : नमस्कार! आपण ऐकत आहात आकाशवाणीचे नाशिक केंद्र

Share

देशदूत डिजिटल विशेष

भारतात रेडिओचा इतिहास तसा जुना आहे. रेडिओचा शोध १८८५ साली इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र, त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते.

इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले. १९३६ साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले.

ऑल इंडिया रेडिओला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची प्रदान केली.

१३ फेब्रुवारी १९४६ मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओ सारख्या प्रभावी प्रसार माध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा उपलब्ध करून प्रदान करणे, तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे असा होता.

आज जागतिक रेडीओ दिन . पूर्वीच्या काळी टीव्ही, मोबाईल येण्याआधी रेडीओवर बातम्या प्रसारित होत असत. यावेळी सकाळी सकाळी ‘नमस्कार! थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बातम्या प्रसारित होतील. हिंदी बातम्या असतील तर त्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित व्हायच्या.

‘यह आकाशवाणी केंद्र है, और आप सून रहे है आप की फर्माईश!’ हा नावाजलेला कार्यक्रम आजही आवडीने ऐकला जातो. लहानपणी विविध भारती, गीतमाला आणि आता विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा आपला लाडका रेडिओ.

आमच्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता आई जरा मोठ्या आवाजाने बाबांना उठवत असे. स्वरावली वाजली की, एखाद्या गृहिणीचा आवाज कानावर येई ती म्हणायची काल सर्व आवरले गेले होते यावेळी आज खूपच उशीर झाला. संध्याकाळी बातम्यांच्या आवाजाच्या साथीने अनेकांचा चहा व्हायचा.

रात्री जेवण करताना किंवा घरातली लहान मुलं झोपताना ‘आपली आवड’मधील गाण्यांचा आनंद श्रोते घ्यायचे. अनेकदा विश्वचषकाच्या सामन्यांचे थेट धावते समालोचन ऐकण्यास क्रिकेटप्रेमींचे कान रेडीओच्या स्पीकरजवळ असायचे. विशेष म्हणजे प्रती चेंडूची संखोल माहिती याठिकाणी श्रोत्यांना ऐकण्यास मिळायची.

मला अजूनही आठवतेय आमचे आजोबा सकाळी उठल्यानंतर आधी रेडीओ सुरु करायचे. आजी रेडीओला ग्रामीण भाषेत रेडू म्हणायची. त्यानंतर घरातील सदस्यांना ती रेडू लागला उठा आता अशा आशयाने आवाज करून सदस्यांना झोपेतून उठवत असे.

दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्रं पहायला मिळत असताना आवाज नुसता कोण ऐकणार? यानंतर मोबाईल आणि सोशल मीडियामुळे रेडिओ हा दुर्लक्षित होता पण आता एफएमच्या आगमनानंतर रेडिओला चांगलाच शुद्ध प्राणवायू मिळालेला दिसून येतो आहे.

आजही अनेक वाहनांमध्ये एफएम आवडीने ऐकला जातो. याचे दोन फायदे आहेत वेळोवेळी घटनेची माहिती होते आणि दुसरा म्हणजे जुन्या नव्या गाण्यांची मैफल याठिकाणी ऐकण्यास मिळते.

सध्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या धावत्या युगात आणि सोशल मीडियाच्या काळात रेडीओने आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे. रेडीओची लोकप्रियता किती आहे हे आजच्या एफएमच्या क्रांतीने जाणवते. सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खाजगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत.

जिकडे मोबाईल सुरु केला तिकडे रेडिओचा आवाज ऐकण्यास मिळतो. त्यामुळे अनेक शोध लागले, क्रांती घडल्या पण रेडिओ टिकून आहे टिकून राहील… यात शंका नाही.

  • दिनेश सोनवणे, देशदूत नाशिक
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!