Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकोरोनानंतरच जग कसं असेल ?

कोरोनानंतरच जग कसं असेल ?

करोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग सध्या आहे. लाखो लोकांना या विषाणूची लागण झाली असून, हजारो जीव गेले आहेत. बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन सुरू असल्यामुळं व्यवहार ठप्प आहेत. उत्पादन बंद आहे आणि अर्थव्यवस्थांची वेगानं घसरण सुरू आहे. देशोदेशीचे शेअर बाजार कोसळले आहेत. हे संकट टळल्यानंतर अनेक गोष्टींचा जगाला नव्यानं विचार सुरू करावा लागणार आहे. अनेक नियम बदलण्याची गरज निर्माण होणार आहे. म्हणूनच, करोनानंतरचं जग वेगळंच असेल, असं म्हटलं जात आहे.

 डॉ.जयदेवी पवार

कोरोनाचं संकट कधीतरी जगाचा पाठलाग सोडेलच; पण तत्पूर्वी या संकटाने जगभरात किती बळी घेतले असतील, हे सांगता येत नाही. संपूर्ण जगभरात वेगानं विषाणूंचा प्रसार झाल्यामुळं देशोदेशी लॉकडाउन करण्यात आले. उत्पादन ठप्प झालं आणि अर्थव्यवस्थांची वेगानं घसरण सुरू झाली. जग आधीच आर्थिक संकटात होतं, त्यात करोना संकटाची भर पडली आणि शेअर बाजार कोसळले. जगातील 110 पेक्षा जास्त देश या भयावह संकटाचा सामना करीत आहेत. अत्यंत प्रगत मानले गेलेले देश कोविड-19 या आजारापुढे गुडघे टेकताना दिसत आहेत.

महासत्ता मानली जाणारी अमेरिका हतबल दिसत असून, युरोपीय देशही करोना संकटाशी झुंजून थकले आहेत. संपूर्ण जगावरच संकट कोसळल्यामुळं कुणी कुणाला मदत करायची, हा प्रश्न आहे. म्हणूनच जेव्हा हे संकट टळेल तेव्हा जगाची नव्यानं मांडणी केली जाईल, अशी अटकळ अनेकांनी बांधली आहे. त्याविषयी लिहिलं-बोललं जात आहे. ज्याप्रमाणे कसोटी क्रिकेटमधील ङ्गलंदाजाला लंच आणि टी-टाइमनंतर नव्यानं खेळी सुरू करावी लागते, मैदानावर स्थिरावण्यासाठी नव्यानं प्रयत्न करावे लागतात, तसंच जगाचं होईल, असं बोललं जात आहे. जगभरातील केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक हालचालीही या संकटामुळं थंडावल्या आहेत. व्हॅटिकन सिटीपासून मक्केपर्यंत धार्मिक स्थळं भाविकांसाठी बंद आहेत. मंदिरं बंद आहेत; गुरुद्वारे बंद आहेत. थोडक्यात, वेगानं धावणार्‍या जगाला अचानक करकचून ब्रेक लागला आहे. जग यापुढे कधी वेग घेईल, हे सांगता येत नाही; पण कसं वेग घेईल याबद्दल मात्र मतं व्यक्त होत आहेत.

- Advertisement -

अमेरिका असो वा ब्रिटन, बाहेरच्या देशांतील नागरिकांना जितक्या मुक्तपणे प्रवेश देत होते, तसे यापुढं देणार नाहीत; उलट ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याला तर अनिवासी लोकांविरुद्ध कठोर पावलं उचलण्यासाठी निमित्त मिळेल, असं मानलं जात आहे. पोलंडच्या पंतप्रधानांनी तर तसा निर्णय जाहीरसुद्धा करून टाकला आहे. इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्येही अशीच पावलं उचलली जातील, असा अंदाज आहे. म्हणजेच, देशाबाहेर काम मिळवून स्थायिक होणं करोनानंतरच्या जगात फारसं सोपं राहणार नाही. शिवाय, देशांतर्गत लोकशाही अधिकारही कमकुवत होऊ शकतात. चीनने ज्याप्रमाणं कठोर पावलं उचलून साथ आटोक्यात आणण्यात यश मिळवलं, ते पाहून संपूर्ण जग प्रभावित झालं.

दुसरीकडे, खुलं वातावरण असलेल्या इटली, स्पेनसारख्या देशांचं कब्रस्तान बनलंय. त्यामुळं तज्ज्ञांच्या मते, भविष्यात देशोदेशीच्या सरकारांचा कल आपल्या हातात जास्तीत जास्त अधिकार एकवटण्याकडे राहील आणि त्यासाठी करोनामुळं निर्माण झालेल्या भयाचा बेमालूम वापर केला जाईल. परंतु एक चांगला परिणामही पाहायला मिळू शकतो. अमेरिका, ब्रिटनसारख्या प्रगत देशांच्या आरोग्य यंत्रणाही आज अपुर्‍या पडल्या आहेत. त्यामुळं अचानक असा विषाणूचा हल्ला भविष्यात झाला तर त्यासाठी सर्वच देश भरपूर तयारी करण्यावर भर देतील. परिणामी सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारतील.
करोनानंतरचं जग बदललेलं असेल, असं म्हणण्यामागे काही कारणं आहेत. अशा प्रत्येक मोठ्या आपत्तीनंतर जगात सामाजिक, राजकीय आणि नैतिक स्तरावर काही मूलभूत बदल दिसून आले आहेत. 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू नावाचा आजार असाच पसरला होता आणि जगभरातील पाच कोटी लोक मरण पावले होते. त्यानंतर सर्वच्या सर्व युरोपीय देशांमधील आरोग्य सुविधांचा गतिमान विकास झाला होता. 2001 च्या 11 सप्टेंबरला अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या सिद्धांताला जगभरात ओहोटी लागली. लोकांवर 24 तास इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून देखरेख ठेवण्यास कायदेशीर मंजुरी मिळाली. विमानतळांपासून बँकांपर्यंतची सुरक्षा व्यवस्था टोकाची बदलून गेली.

त्याचप्रमाणे 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर संपूर्ण जगभरात आर्थिक तंत्र बदलून गेले. खासगी बँका आणि संस्थांवर कठोर नियम लागू झाले. जगात शेअर बाजार आणि बँका यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या संस्था अधिक मजबूत झाल्या. नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार्‍या संस्थांमध्ये त्यांचं रूपांतर झालं. आर्थिक गुन्ह्यांबद्दल कठोर शिक्षेच्या तरतुदी विविध देशांत करण्यात आल्या. त्यामुळेच करोनानंतरसुद्धा जगात फार मोठे फेरबदल होतील, असं गृहित धरलं जात आहे.
सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जगाचे ध्रुव कोणते असतील? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असोत किंवा इस्राएलचे पंतप्रधान नेत्यानाहू असोत, सर्वजण करोना विषाणू हा चीनचा मानवनिर्मित विषाणू असल्याचं सांगतात. अधिकांश देश चीनच्या बेजबाबदारपणामुळं जगात हा विषाणू पसरला असं मानतात. म्हणजेच, एकंदरीत चीनकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन आता बदलणार आहे.

चीनमधील खाण्या-पिण्याच्या सवयींवरही जगाकडून तोंडसुख घेतलं जातंय. जगातील 35 देशांमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चीनची प्रतिमा जगाच्या नजरेत बदलत आहे, हे या घडामोडींवरून स्पष्ट होतं. त्याचप्रमाणं करोनाचा विषाणू जगातील लोकांच्या काही सवयी कायमस्वरूपी बदलून टाकेल, अशीही शक्यता आहे. उदाहरणार्थ, भेटणार्‍या व्यक्तीसोबत हस्तांदोलन करणं, मिठी मारणं, गालाचं चुंबन घेणं अशा स्वागताच्या अनेक पद्धती जगात प्रचलित आहेत. करोना विषाणूनं माणसामाणसात जे अंतर निर्माण केलंय, ते नंतरही काही ठिकाणी कायम राहील आणि अभिवादनाच्या, स्वागताच्या पद्धती कायमस्वरूपी बदलतील, असा अंदाज आहे. माणसा-माणसात अंतर राखण्याचा नवा सिद्धांत करोनामुळं विकसित होईल, असं काही तज्ज्ञ मानतात. भारतात तर शारीरिक अंतर राखण्याचाच सिद्धांत सुरुवातीपासून पाळला आहे.

तज्ज्ञांच्या मते, करोना विषाणूंमुळं जगभरात अनेक ठिकाणी धार्मिक स्थळं बंद करण्यात आल्यामुळं आणि अनेक बड्या धार्मिक नेत्यांना संसर्ग झाल्यामुळं धार्मिक श्रद्धांमध्येही काही बदल होतील. काही बडे धार्मिक नेते या संसर्गाच्या कालावधीत सार्वजनिक जीवनातून जणू गायब झाले आहेत. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये धार्मिक श्रद्धांचं प्रमाण पूर्वीपासूनच मर्यादित होतं, ते आणखी कमी होईल अशी शक्यता आहे. 1858 मध्ये अमेरिकेत पिवळा ताप आल्यामुळं आरोग्य सुविधांमध्ये मूलभूत बदल झाला होता.

2001 नंतर तिथं परदेशातून आलेल्या लोकांचा डेटाबेस बनवण्यास सुरुवात झाली. अमेरिकेत पोहोचल्यानंतर लोकांना लगेच स्क्रीनिंगचे सोपस्कार पार पाडावे लागतात. 14 व्या शतकात युरोपात ब्लॅक डेथ नावाच्या रहस्यमय तापाची साथ पसरली होती. त्यानंतरही बरेच वांशिक उत्पात घडले होते. त्याचप्रमाणं करोनाची साथ आटोक्यात आल्यावरही काही घटना घडण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवितात.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अर्थकारणात टोकाचा बदल होणार आहे. सध्या जगाचं अर्थकारण अत्यंत लवचिक आहे. 1930 च्या दशकातील मंदी असो, 1990 चं आर्थिक संकट असो वा 2008 ची जागतिक मंदी असो, हे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेनं पचवले होते. परंतु अशा भक्कम जागतिक अर्थव्यवस्थेला करोना विषाणूनं गुडघे टेकायला लावलं आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेनं करोनापासून काही धडे घेतले आहेत आणि तज्ज्ञांच्या मते करोनानंतर जागतिक अर्थकारणात मोठे बदल संभवतात. ते सध्या आहे तेवढं लवचिक निश्चितच असणार नाही. केवळ अर्थकारणच नव्हे तर जगात काही सांस्कृतिक बदलही घडून येतील.

पौर्वात्य जगावर सामान्यतः पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आहे. विशेषतः ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली हे युरोपीय जीवनशैलीचे चार प्रमुख स्तंभ मानले जातात. हे चारही देश सध्या करोनाच्या राक्षसाशी घनघोर लढाई करीत आहेत. तेथील रेस्तराँ आणि दारूचे बार ही संस्कृतीच करोनाचा विषाणू पसरण्याचा प्रमुख मार्ग ठरली, अशी तेथील लोकांची धारणा बनली आहे. तिथं वयाची 15 वर्षे पूर्ण करणारा कोणीही दारू पिऊ शकतो आणि 70 टक्के लोक बारमध्ये बसूनच दारू पितात. सामूहिकरीत्या रेस्तराँमध्ये जेवायला जाणं हाही तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. हा खुलेपणा करोनानंतरच्या काळात या देशांमध्ये कायम राहणार नाही, असं जाणकारांना वाटतं. म्हणजेच, जगात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठी उलथापालथ करोनाविरुद्धचं युद्ध संपल्यानंतर पाहायला मिळणार आहे. हे वेगळंच जग असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या