विकासाची स्पर्धा निर्माण होण्यासाठी सुसंवादातून काम करावे

0

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांचे प्रतिपादन

लोणी (प्रतिनिधी) – गावपातळीवर विकासाची स्पर्धा निर्माण होण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी आणि पदाधिकार्‍यांना चांगल्या सुसंवादातून काम करावे लागणार आहे. राहाता तालुका हा नेहमीच विकासकामांच्या बाबतीत आघाडीवर राहिला असून योजनांच्या पाठपुराव्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांनी केले.

प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात ग्रामसेवक, तलाठी आणि अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, प्रशांत शिर्के, मनोज ससे, उत्पादन शुल्क अधिक्षक पराग नवलकर, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, प्रांताधिकारी नितीश ठाकरे, गटविकास अधिकारी जयंत ओगले, नायब तहसीलदार राहुल कोताडे आदींसह सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

या मेळाव्यात प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांचा सत्कार करण्यात आला.  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. विखे म्हणाल्या, राहाता तालुक्यात 50 ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र आहे. या सर्व गावांना विविध योजनांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. नव्या धोरणानुसार विकास कामांचा निधी आता थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने या निधीचे नियोजन स्थानिक पातळीवर योग्य त्या समन्वयातून झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्या म्हणाल्या, विकासासाठी ग्रामपंचायतींमध्ये कामांची स्पर्धा झाली पाहिजे.

शासन निधीचा योग्य तो उपयोग करून लोणी ब्रुद्रुक ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार मिळवले, याकडे लक्ष वेधून प्रत्येक गावाने विकासाचे असे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.  विकास कामांबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पाठपुरावा हा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत झाला पाहिजे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका, स्वच्छतेला अग्रक्रम देतानाच करवसुलीलाही प्राधान्य देणे गरेजेचे आहे. मुलीच्या जन्माचे गावपातळीवर स्वागत करून चांगले वातावरण निर्माण करा, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.

याप्रसंगी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उज्वला बावके, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गटविकास अधिकारी जयंत ओगले यांनीही उपस्थितांना मार्गदशन केले. यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन दिनेश भाने यांनी केले तर आभार गणेश वाकचौरे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*