महिला बचतगटांची उत्पादने देशपातळीवर पोहोचविणार : जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे

0

लोणी येथे स्वयंसिद्धा यात्रेचे उद्घाटन

लोणी (वार्ताहर) – महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी स्वयंसिद्धा महोत्सव हा नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने फुलांपासून उदबत्तीचे उत्पादन सुरू करून जनसेवा फाउंडेशनचे नाव देशपातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले. येत्या 7 जानेवारीपासून अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने बचत गटांच्या साईज्योती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनसेवा फाउंडेशन लोणी, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, पंचायत समिती राहाता आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व स्वयंसिध्दा यात्रा 2017 चे उद्घाटन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी धनश्रीताई विखे, सभापती हिराबाई कातोरे, नगराध्यक्षा योगिताताई शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी पंडितराव लोणारे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, सभापती बापूसाहेब आहेर, अध्यक्ष नंदू राठी, उपसभापती बबलू म्हस्के, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, उत्पादन करणे सोपे पण विक्री व्यवस्था करणे हे आव्हान असते. बदलत्या काळात ग्राहकांना ब्रँडनेम पाहिले आहे. एखाद्या उत्पादनाने नाव कमाविले तर ते ग्राहकांच्या लक्षात कायम राहाते. अशा पध्दतीने आता जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचतगटांनी स्वतंत्र असा ट्रेडनेम तयार करून उत्पादनाचे मार्केटींग करावे, असे आवाहन केले. बचत गटांना देण्यात येणार्‍या कर्जाची आम्हाला कधीच चिंता नसते. वेळेवर वसुली झाल्याने बचतगटांना दिलेले कर्ज बुडत नसल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी जनसेवा फाउंडेशनच्या उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख करून नगर जिल्हा हा नेहमीच बचतगटांच्या चळवळीत अग्रेसर राहिला आहे. केवळ जिल्हा पातळीवरच नाही तर विभागीय पातळीवरचे प्रदर्शन भरवून जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना प्रोत्साहन दिले आहे. येणार्‍या काळातही महिला बचतगटांच्या कौशल्यवृध्दीसाठी जिल्हा परिषदेचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी सभापती हिराबाई कातोरे, नगराध्यक्षा योगिता शेळके यांची भाषणे झाली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केले तर आभार सभापती बापूसाहेब आहेर यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचतगटांच्या सदस्या व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस चालणार्‍या प्रदर्शनात 150 स्टॉल असून विविध खाद्यपदार्थ, गृह सजावटीचे साहित्य, मसाल्याचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
स्वयंसिद्धा यात्रा महोत्सवात अनेक व्यावसायिकांनी स्टॉल लावले. ट्रॅक्टरच्या स्टॉलची पहाणी केल्यानंतर ट्रॅक्टरवर बसण्याचा मोह अध्यक्षांना आवरला नाही.

2007 सालापासून स्वयंसिध्दा यात्रा या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यापूर्वी राहाता शहरात हा उपक्रम भरविण्यात येत असे. यंदा प्रथमच लोणीत या यात्रेचे आयोजन करून महिला बचत गटांना मोठी संधी मिळवून दिली आहे. महिला बचतगट उत्पादन करतात, पण त्यांच्या विक्री व्यवस्थेचा मोठा प्रश्‍न असतो. आकर्षक पॅकिंग व ब्रँडिंग आता ग्राहकांना हवे आहे, याचा विचार करूनच बचतगटांना मार्गक्रमण करावेच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी मानून जनसेवा फाउंडेशन विविध उपक्रम राबवीत आहे. साई मंदिरात जमा होणार्‍या फुलांपासून उदबत्त्यांचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून बचतगटांना मोठी संधी मिळेलच, पण यापेक्षाही फाउंडेशनचे नावही देशपातळीवर जाण्यास मदत होईल, असे शालिनीताई विखे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*