महिला पोलीस सुभद्रा पवार आत्महत्त्या प्रकरण; आरोपीला तातडीने अटक करा : तृप्ती देसाई

0

देसाई यांच्या नेतृत्वाखाली अकोलेत सर्वपक्षीय व  सामाजिक संघटनांचा मोर्चा

अकोले (प्रतिनिधी)- रक्षकच  भक्षक बनला तर न्याय मागायचा कुणाकडे असे म्हणत महिला पोलीस सुभद्रा पवार हिच्या आत्महत्त्या प्रकरणातील मुख्य आरोपी एसीपी शामकूमार निपुंगे यास आठवडाभराच्या आत अटक केली नाही तर ठाणे आयुक्त कार्यालयात ठाण मांडून बसू असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.

सुभद्राच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्यासाठी विशेष सरकारी वकिल नियुक्त करावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. घटनेच्या निषेधार्थ भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली काल गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी सर्वपक्षीय व सामाजिक संघटना यांच्या वतीने बसस्थानकापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात मोर्चा आल्यावर पोलिसांनी मोर्चा अडविला.

लिंगदेव येथील असलेली सुभद्रा वसंत पवार ही 2014-15 पासून मुंबई पोलीस दलात सेवेत होती. जुलै,ऑगस्ट 2017 दरम्यान ड्युटी संपवून घरी परतत असताना ठाणे पोलिस दलातील एसीपी शामकूमार निपुंगे याने सुभद्रा व तिची सहकारी यांना गाडीत बसवून घरापर्यंत सोडले व त्यांचे मोबाईल क्रमांक घेतले.

पुढील तीन दिवसांत एसीपी निपुंगे सुभद्राला फोन करून तुझ्या ड्युटीची सेटिंग लावून देतो, तुला व्यवस्थित ड्युटी लावून देतो, तू माझ्याकडे ये…तुला कधीच ड्युटी करायची गरज पडणार नाही अशा प्रकारे वारंवार व रात्री बेरात्री फोन करून मानसिक त्रास देत होता.

निपुंगे याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून सुभद्रा हिने आपला होणारा नियोजित पती मुंबई पोलीस दलातील शिपाई अमोल फाफळे याला बोलावून हा सर्व प्रकार सांगितला. मात्र त्यानेही तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तू नालायक आहेस,… तू मरून जा… मला तुझ्याशी लग्न करायचे नाही …अशा शब्दांत तिचा अपमान केला.

या सर्वास कंटाळून सुभद्रा हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. या घटनेला एक महिना उलटूनही आरोपीना पोलीस वाचवत आहेत. सहआरोपी अमोल फाफळे यास गुन्हा दाखल करून 22 दिवसांनी अटक केली तर मुख्य सूत्रधार निपुंगे हा महिना भरापासून फरार आहे.

यावेळी निर्भया या मराठी चित्रपटाची नायिका योगिता दांडेकर, निर्माते आनंद बच्छाव, वकील मंगला हांडे, मंगल जाधव, जोशी, कु.उज्वला वाकचौरे, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, जिप सदस्य डॉ.किरण लहामटे, सेनेचे युवा नेते सतीश भांगरे, पं. स.चे उपसभापती मारुती मेंगाळ, मयत सुभद्राचा भाऊ सुजित पवार यांची भाषणे झाली.

प्रास्ताविक डॉ. संदीप कडलग यांनी केले. तहसीलदार मुकेश कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शना खाली राजूर चे सहा.पो.नि. भरत जाधव,अकोले चे उप निरीक्षक नितीन बेंद्रे , विकास काळे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चात लिंगदेव येथील ग्रामस्थ व महिला यांचेसह विद्यार्थिनी, सहभागी झाल्या होत्या.

  पोलिसांना सर्वसामान्य माणूस आपला रक्षक मानतो मात्र सुभद्राच्या बाबतीत रक्षकच भक्षक बनल्याचे दिसत आहे. महिना होऊनही पोलीस मुख्य सुत्रधारास अटक करू शकले नाही, गृहमंत्री काय झोपा काढतात काय? असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला. जर आठवडा भरात एसीपी निपुंगे यास अटक केली नाही तर आपण स्वतः महिलांना घेऊन ठाणे आयुक्त कार्या लयात ठाण मांडून बसू, जो पर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तो पर्यंत महिला जागा सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. जर पोलीस आरोपीला अटक करू शकणार नसेल तर आम्ही त्याला सापडून रस्त्यावर चोप दिल्या शिवाय राहणार नाही,तेंव्हाच सुभद्राला न्याय मिळेल असा सज्जड दमही त्यांनी दिला.राजकीय पक्ष आपले झेंडे बाजूला ठेऊन एकत्रित आले तर कोणत्याही महिलेला अन्यायाला सामोरे जावे लागणार नाही असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

  राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री पद सांभाळत आहेत. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र गृहमंत्री द्यावा  अशी मागणी तृप्ती देसाई यांनी करून सुभद्रा पवार प्रकरणी आपण येत्या दोन तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना  भेटणार आहोत, सुभद्राला न्याय मिळेपर्यंत आता माघार नाही असेही त्यांनी जाहीर केले.

 

LEAVE A REPLY

*