सिव्हीलमध्ये बाळंतिणीचा मृत्यू

0

प्रसूती विभागात असुविधा, पुन्हा वादाचा विषय

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) मृत्यू झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली. महिलेच्या मृत्यूने सिव्हील हास्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

पाथर्डी तालुक्यातील ज्योती शिरसाठ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शिरसाठ यांचा मुत्यू कशामुळे झाला याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गाडे यांच्याशी संपर्क साधला प्रसृतीनंतर अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

शिरसाठ यांच्या मृत्यमुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागातील समस्या, तेथे असणार्‍या असुविधांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रुग्णालयातील प्रसुती कक्षात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्यचो दिसून येते. कॉट अपुरे पडल्याने फरशीवर महिला रुग्ण पडून असल्याचे प्रत्यक्ष भेटीत दिसले.

आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील जिल्हाभरातून महिला प्रसुती सिव्हील हॉस्पिटलमध्ये येतात. जागेअभावी त्यांना जमिनीवर आंथरून देत अ‍ॅडमीट करून घेतले जाते. प्रसृती विभागातील क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला असला तरी त्याचा पाठपुरावा मात्र कोणी करत नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील ज्योती योगेश शिरसाठ यांच्या मुत्यूमुळे आता हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिरसाठ यांचा मृत्यू प्रसुतीनंतर झालेल्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे झाला असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला असून मृत्युची सखोल चौकशीची मागणी होत आहे.

लालफितीत अडकला प्रस्ताव
जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागातील मर्यादा लक्षात घेता राज्य सरकारने चार वर्षापूर्वी नगर शहरात 100 खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालयाल उभारण्यास मंजूरी दिलेली आहे. मंजुरीनंतरची कार्यवाही मात्र लालफितीत अडकली आहे.त्याचा फटका मंजूरी मिळालेल्या रुग्णालयाला बसला आहे. शहरातील चितळेरोडवर जुन्या सिव्हील हॉस्पिटल परिसरात नव्याने रुग्णालय बांधण्यासाठी जागाही उपलब्ध आहेे. मात्र, महापालिकेच्या पार्किंग प्रस्तावाच्या अडकाठीमुळे ही जागा मिळण्याकरीता सिव्हील प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे.

प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने शिरसाठ यांचा मृत्यू झाला. प्रसुती विभागाची क्षमता 30 बेडची असून ते अपुरे पडते. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांची धावपळ उडते. नव्याने रुग्णालयास झाल्यास ही समस्या सुटेल.
– डॉ. बापूसाहेब गाडे
प्रभारी, सिव्हील सर्जन.

LEAVE A REPLY

*