पाटाच्या पाण्यात अनोळखी महिलेचा मृतदेह

0

वडाळा महादेव (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा परिसरातील रेल्वे चौकीजवळ पाटात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने रस्त्याने जाणार्‍यांनी चांगलीच गर्दी केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.

रेल्वे चौकी परिसरात देवकर वस्तीजवळ चारी नं 9 च्या गेटजवळ एक अनोळखी महिलेचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत रस्त्येने जाणार्‍यांनी पाहिला. नंतर तेथे मोठी गर्दी झाली. काही नागरिकांनी याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांना कळविले. तेव्हा श्रीरामपूर शहर ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव व प्रदीप बढे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जागेची पहाणी केली.

नंतर काही नागरिकांच्या मदतीने या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. ही महिला कोण याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. या महिलेचा रंग सावळा असून चॉकलेटी रंगाची साडी परिधान केलेली आहे. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातलेल्या आहेत.

या महिलेचे वय साधारणपणे 30 ते 35 च्या आसपास आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या महिलेबाबात कोणालाही काही माहिती असल्यास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही महिला कोण, ती पाण्यात कशी पडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*