Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्या

Share

मुख्यमंत्री ठाकरे यांना आमदार रोहित पवार यांनी दिले निवेदन

कर्जत (वार्ताहर) – आरक्षणासारख्या सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेतल्याबद्दल राज्यातील अनेक मराठा आणि धनगर समाजातील तरुणांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या तरुणांनी कोणतेही गुन्हेगारी कृत्य केलेले नसून त्यांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केल्यामुळे हे गुन्हे दाखल झाले आहेत. शैक्षणिक पात्रता असताना देखील नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी हे गुन्हे मोठा अडथळा ठरत आहेत. दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांतून तरुणांना, सामाजिक कार्यकर्त्यांना मुक्त करावे, अशी विनंती कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार पवार यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गुन्हे दाखल झालेल्या तरुणांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौण्डी येथे आल्या असताना धनगर समाज बांधवांनी त्यांना आरक्षणाबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांकडून त्यांना लाठीमार करून त्या समाजबांधवांवर 307, 120 ब 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

संबंधित तरुणांवर अन्याय झाला असेल तर योग्य निर्णय घेऊन त्यांना यातून निश्चितच बाहेर काढण्यात येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना दिला. त्याचबरोबर तरुणांसाठी त्रासदायक ठरलेलं महापोर्टल बंद करण्याचा अपेक्षित निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी हे सरकार तेवढ्यावरच थांबणार नाही, तर नोकर भरतीसंदर्भात यापुढील कार्यवाही देखील युवकांच्या मागणीप्रमाणेच होईल असा विश्वासही ठाकरे यांनी दिला.तरुणाईच्या भविष्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय होत असून युवकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते अग्रक्रमाने सोडवत असलेल्या आमदार रोहित पवार यांची तरुणाईत मोठी क्रेज निर्माण होताना दिसते.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!