Friday, May 3, 2024
Homeब्लॉगप्रज्ञा जागृत करायला हवी !

प्रज्ञा जागृत करायला हवी !

शिक्षणाने प्रत्येकात दडलेल्या माणूसपणाचा शोध घेऊन त्याची वृध्दी करायला हवी. जीवनात असलेल्या नकारात्मकतेचे होणारे प्रदर्शन थांबवायला हवे आणि जीवनात अधिक संवेदनशीलतेचे आणि सहहदयतेने जीवन गतीमान करण्यासाठी पेरणीचे काम शिक्षणातून व्हायला हवे.

शिक्षण म्हणजे मानवाचे माणसांत रूपांतरण करणे असते.व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देणे असते.ते व्यक्तिमत्व बाहयांगाने जितके चांगले घडविले जाईल त्यापेक्षा अंतरंगाने जडणघडण करणे अधिक महत्वाची आहे. त्या जडणघडणीसाठी आणि माणंसात रूपांतर करण्यासाठी शिक्षणाने विचार करायला शिकविणे महत्वाचे आहे. शिक्षणातून विचार करायला शिकविला जातो असे तर नेहमी म्हटले जाते.

- Advertisement -

शिक्षणाने काय विचार करावा यापेक्षा कसा विचार करावा यावर भर द्यायला हवा. काय विचार करावा यावर भर दिला गेल्यांस एकाच छापाची व्यक्तिमत्व विकसित होत जाते.समाज व राष्ट्र विकासाकरीता एकाच छापांची गरज नाही. आज आपण काय विचार करावा हे शिकवत आहोत पण कसा विचार करावा हे मात्र शिकवत नाही.

कसा विचार केला जातो यात विवेकाचीदृष्टी असते.चांगले,वाईट कळण्यास मदत होते. मात्र आपण काय या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करत नाही . त्यामुळे शिक्षण घेऊनही अविवेकाची काजळी विचारावर राज्य करते. शिक्षणातून साक्षर होऊनही समाजात शहाणपणाची पेरणी होत नाही.समाजात विचाराचे राज्य येण्याऐवजी अविचाराचे साम्राज्य प्रस्थापित होते.अहिंसेच्या मार्गापेक्षाही हिंसा प्रिय ठरते.आणि विवेकाअभावी मुखवट्याच्या मागे धावणे होते.

प्रतिष्ठेच्या खोटया संकल्पना मनावर राज्य करतात.मुखवटयाची माणंस मोठी वाटू लागतात.त्याच्या सावल्या राज्य करतात..पण जेव्हा छोटया माणंसाच्या मोठया सावल्या पडतात तेव्हा समाज व राष्ट्राचा अंत जवळ आला आहे असे समाजावे. कधी काळी आपल्या समाजाने आकाशाच्या उंचीचे माणंसे पाहिली. आज माणंस लहान झाली आणि त्यांची राहण्याची ठिकाणे उंच झाली.

श्रीमंतीची स्वप्न मोठी झाली आणि माणूसपणाची स्वप्न हरवत चालली. माणूसकीच्या भिंती कोसळू लागल्या आणि सिमेंटच्या भिंती अधिक भक्कम उभ्या राहू लागल्या. माणंसाच्या डोळ्यातून अश्रूच्या माध्यमातून दिसणा-या संवेदनाची जागा विकृतीच्या हास्यानी घेतली.कौतूकाच्या शब्दांचा फुलोरा आटत गेला आणि टोमण्याच्या शब्दांचा महापूर येत गेला.

निस्वार्थपणाच्या नात्याचा ओलावा संपत चालला आणि स्वार्थीपणाच्या हेतूने नाते जपण्यासाठी देखावे वाढू लागले , पण त्यातील कोरडेपणा अधोरेखित होतांना दिसू लागला. हदयातील स्नेहाचे शब्द आटू लागले. दुस-याच्या आनंदाच्या क्षणासाठीचे आपल्या डोळ्यात दिसणारे अश्रू दिसेनासे झाले.सेवेलाही प्रसिध्दीचे वलय येऊ लागले.सेवा हि आता दिखाऊ बनू लागली. दर्शनीय काय आणि प्रदर्शिय काय याचा विचार हरवत चालला.

मीच्या पलिकडे आपण असतो हा भाव गळत चालला. मीच केंद्रस्थानी असल्यांने काय विचार करायचा हे “ मी ” भोवती केंद्रीत होऊ लागला. त्यामुळे माणंसातील चांगुणपणापेक्षा विकृती अधिक वर दिसू लागली.शांत असणारा माणूस अशांत आणि अहिंसक असलेला हिंस्त्र दिसू लागला. माणूंसपणाची खोली उथळ होऊ लागली.या हरवलेल्या गोष्टी शिक्षणातून केल्या जाणा-या पेरणीचाच परिणाम असतो.

आपण विचार करायला शिकवितो पण त्याच्या केंद्रस्थानी काय आहे हे महत्वाचे आहे. शिक्षणातून काय विचार करायचा हेच हरवत चालले आहे का ? अशी शंका येते. त्यामुळे तर “ गळ्यात हात टाकणारे हात केव्हा गळफास लावतील याचा नेम राहीला नाही ” असे कविला म्हणावे का वाटते ? याचा विचार करायला हवा. त्यातून अशा शिक्षित असलेल्या समाजावर देखील अशिक्षित आणि अविवेकी विचाराचा पगडा कायम राहातो.त्यामुळे अवतीभोवती सूर्याच्या प्रखर प्रकाशात देखील अविवेकाचा अंधार कायम राहातो.

माणंसाच्या आत जे दडलेले आहे त्या विशेषत्वाची ओळख शिक्षणातून व्हायला हवी असते.अनेकदा आपण जीवनात यशस्वी माणंस आपल्या अवतीभोवती पाहातो. पण त्यांच्या ज्या गुणांमुळे ते जीवनात यशस्वी होतात त्या गुणांचा तर शिक्षण सुरू असतानाच्या प्रक्रियेत शोधही लागलेला नव्हता. विस्टन चर्चिल यांना आपल्या वक्तृत्व कलेचा शोध वयाच्या चाळीसाव्या वर्षी लागला होता.महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते ,संपादक आचार्य अत्रे यांना तर शाळेत गोष्ट सांगता आली नव्हती.त्यामुळे दडलेले बाहेर पडेल अशी स्थिती खरच आपण निर्माण करण्यात अपयशी ठरत आहोत का ? शिक्षणातून प्रत्येकाच्या आत दडलेल्या सुप्त गुणांचा परिपोष करायला हवा असतो.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आत एक शक्ती दडलेली असते. तिचा विकास हे मोठे आव्हान आहे. त्या सुप्त शक्तीचा विकास केला,की व्यक्तीचे पूर्ण रूप अनुभवता येते. त्या दिशेने प्रवास घडला तर जगण्याला समृध्दतेची वाट मिळते. अन्यथा शिक्षण घेऊनही निराशेच्या वाटेने जाणे घडते. शिक्षणाने आपले काम योग्य दिशेने केले नाही, तर त्यातून केवळ पोटासाठी कार्यरत राहावे लागते. त्या पोटाची भूक भागविली जाते ,पण त्या वाटेने आनंदाची भूक रिती राहाते. शिक्षणाचा अर्थ आतील बाहेर काढणे आहे. सध्या मात्र बाहेरील आत लादले जात आहे.कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की “ आजचे शिक्षण पूर्ण विफल ठरले आहे. त्यातून भयानक विनाश आणि दुःख निर्माण झाले आहे ”.

एका विशिष्ट पध्दतीने आणि पध्दतीचे विचार लादले गेल्यास समाजात संघर्षाची पेरणी होत राहाते. व्यवस्थेला कोणता समाज हवा आहे त्याची पेरणी होते.मात्र त्यातून माणूसपण हरवले जाते. शिक्षणातून हिंसेचा मार्ग निर्माण होत नाही, प्रेम पेरले जाते.संवेदना निर्माण केल्या जातात.विश्वास निर्माण होतो.जात,पात,धर्म यापेक्षा माणूंसपण जोपासणे घडते. पण वर्तमानात अवतीभोवती या गोष्टी हरवत चालल्या आहेत का ? असा प्रश्न पडतोच ना ! हिंसा ठासून भरली आहे.

कधीकाळी या देशाने कायिक, वाचिक,मानसिक हिंसेचा विचार केला जात होता.आज तो विचार दिसत नाही.मन जोपासणे घडत नाही. नात्याची वीनही सैल होत चालली आहे. नात्यातील ओलावा संपत आहे. पैसा नात्यावर आणि विश्वासावर स्वार होतो आहे.श्रींमती हेच वास्तव बनत चालले आहे. पैशाच्या श्रीमंती करीता सुरू असलेल्या स्पर्धेत हिंस्त्रता दिसते आहे. विचाराची श्रीमंतीचे महत्व आटत चालले आहे. ज्ञानाची उंची हरवत चालली आणि माहिती ओझे मोलाचे वाटू लागेल आहे. ही अपयशाची वाट चालतांना यशाचा भास होतो आहे हे शिक्षणाचे अपयश आहे.

शिक्षणातून आपल्याला समाजाची निर्मिती अपेक्षित असेल तर आपण प्रज्ञा जागृत करायला हवी.त्याशिवाय ज्ञानमय समाज निर्माण करणे शक्य नाही.ज्ञानमय समाजच विचार कसा करावा हे सांगणार आहे. आपण जोपर्य़ंत शिक्षणाचा विचार गंभीरपणे करीत नाही तोपर्य़ंत सदृढ समाज निर्माण करणे शक्य नाही. शिक्षणाविषयी आपण जेव्हा गंभीर बनतो.त्यातून आपण नव्या वाटा शोधण्याचा विचार करतो तेव्हाच शिक्षणातून अपेक्षित माणूस निर्माण करता येतो.शिक्षण कधीच कोणत्याही प्रयोगाचा पाठलाग करणार नाही.

शिक्षण कोणत्याही प्रयोगाचे अनुकरण करत नाही. त्या पावालावर पाऊल ठेऊन पुढे जाणे घडावे असेही नाही. शिक्षण नाविन्याचा शोध घेते.तो शोध व्यक्तिच्या केंद्रस्थानी असलेल्या विचाराचा असतो.सुप्त शक्तीचा विकास असतो.त्यामुळे पेरणीच्या केंद्रस्थानी स्वतःचा शोध असायला हवा. आपण मुलांना शिक्षण का देतो.कशासाठी शिक्षणाची प्रक्रिया करणे अपेक्षित आहे या बाबत विचार करतो का ? आपण का जगतो ? या जीवनाचा उददेश काय ? जीवनाचा आणि शिक्षणाचा नेमका अर्थ काय आहे ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

मुलांवर आपण काही विचारशुन्यतेने आणि सवयींने अथवा पगडयांने स्विकारलेले काही लादणे नव्हे. आपल्यासारखा ,आपल्या विचाराचा, आपल्या प्रवृत्तीचा माणूस घडविणे नाही तर कसा विचार करायचा हे सांगितले की व्यक्तिच्या आतला आवाज अधिक जागा होतो . माणूसपणाच्या एका उंचीवर त्याला पोहचविता येते.

त्या उंचीच्या माणंसानी समाज समृध्द होतो आणि राष्ट्र प्रगत ठरते.मनातील विषयाच्या कामना संपुष्टात येतात. “ दुरीताचे तिमीर जावो…जे खळांची व्यंकटी सांडो ” ही भावना निर्माण होते. न शिकलेल्या माणसाच्या मनात इतक्या उंचीने विचार येतात.त्यामागे विचार प्रक्रियेचे शहाणपण असते.स्वतःचा आंतरिक शोध असतो. ते शहाणपण समाजातील अनेकांना लाभले. त्यांना संतत्व बहाल झाले. समाजाचे नेतृत्व त्या लोकांनी केले. त्या दिशेचा प्रवास सुरू राहाण्यासाठी शिक्षणातून पेरणीची गरज आहे.

– संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या