दारूबंदी… तरीही विक्रेत्यांची चांदी..!

0
नवीन नाशिक /इंदिरानगर| दि. १६, प्रतिनिधी- राष्ट्रीय महामार्गावरील अपघातंांचे प्रमाण चिंताजनक असल्याच्या कारणावरून महामार्गाच्या दोन्ही बाजुला ५०० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारची दारू विक्री करता येणार नसल्याचा विशेष अध्यादेश राज्य शासनाने काढला. त्यानुसार महामार्गालगत दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असली तरी अजूनही महामार्गालगतच्या मोठमोठ्या हॉटेलातून सर्रासपणे ‘मद्यपानाचा कार्यक्रम’ राजरोसजपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

महामार्गालगत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी दारू बंदीचे हे लोण आता शहराच्या विविध भागातील नागरी वसाहतींमध्येही वेगाने पसरले असून दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागातून दारू विक्रीला बंदी करण्यासाठी नागरीक आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.

त्यामुळे शासकीय यंत्रणा व संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मात्र महामार्गालगतच्या नामांकित हॉटेलातून सर्रासपणे मद्यपानाला परवानगी दिली जात असल्याने यामागे अर्थकारणाचे गणित असल्याची शंका सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

एखादा छोटा-मोठा अवैध दारू विक्रेता सापडल्यावर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी तत्पर असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित यंत्रणेच्या दृष्टीस चोरी-चुपके परंतु खलेआम सुरू असलेला दारू विक्रीचा प्रकार पडत नाही का? की ‘दृष्टी आड सृष्टी’चा नियम वापरून त्याकडे सोयी(?)स्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बंद दाराआड पार्टी
महामार्गालगतच्या उंची हॉटेलमध्ये काही तासांसाठी खोल्या भाडेतत्त्वावर दिल्या जातात. या खोल्यांच्या बंद दाराआड काय चालते याची पूर्ण कल्पना हॉटेल व्यवस्थापनाला असूनही गल्लाभरू वृत्तीच्या हव्यासापोटी शासनाच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन केले जात आहे. बहुतांश वेळेला तर अधिक मोबदल्याच्या बदल्यात हॉटेल व्यावसायिकांकडून सगळी ‘व्यवस्था’ केली जात असल्याची माहिती व दिसत असूनही संबंधित यंत्रणा कोणत्या वजनाच्या दबावाखाली याकडे कानाडोळा करीत आहे याविषयी जनमाणसात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
मोठ्या हॉटेलातून मद्यपानासाठी स्वतंत्र खोल्या दिल्या जातात. या ठिकाणी येणारे ग्राहक स्वत:च बाहेरून ‘पार्सल’ घेऊन येतात व काही तासांसाठी खोली ‘बुक’ करून बंद दाराआड ‘एन्जॉय’ करीत असतात. तर काही वेळा हॉटेल व्यवस्थापनाकडूनच अशा ‘खास’ ग्राहकांसाठी ‘खास’ व्यवस्था केली जाते.

त्यासाठी पुरेसा मोबदलाही आकारला जातो. ‘शौक’ पूर्ण करण्यासाठी ‘शौकिनां’कडूनही खिसा सैल केला जातो. हे सगळे प्रकार घडत असल्याची माहिती संबंधित यंत्रणेला नाही असे म्हणणे निश्‍चितच धाडसाचे ठरेल. परंतु संबंधित यंत्रणा ‘दबावा’खाली असल्याने त्यांच्याकडून या ‘कृष्णकृत्यां’कडे सहेतूक दुर्लक्ष केले जात असल्याची शंका परिसरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.
दारू बंदी… विक्रेत्यांची चांदी
महामार्ग परिसरात दारूबंदी झाल्याने शहरांतर्गत महामार्गावरील दारू दुकानेही बंद झाली आहेत. या बंदीचा फटका या दुकानदारांना सर्वाधिक बसला आहे. मात्र ५०० मीटरच्या सीमारेषेबाहेरील व नागरी वसाहतीतील दारु, वाईन शॉपींमध्ये दारूबाज ग्राहकांच्या रांगा लागल्याची चित्रे सोशल मीडियातून फिरली.

काही काळापूर्वी नोटबंदीमुळे बँकासमोर लागलेल्या रांगांचे दृष्य डोळ्यासमोरून धूसर होते न होते तोच दारू दुकानांसमोरील रांगांचे चित्र तरळू लागले. मात्र दोन्ही रांगांमधील कारणे वेगळी असली तरी आधीच्या रांगेविरोधात कोल्हेकुई करणार्‍यांची बोलती यावेळी बंद का झाली, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडला आहे. मात्र या रांगांनी दारू विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आल्याची खात्री पटली असून भविष्यात काहीही होवो… मात्र आज या व्यावसायिकांची पवर्णी सुरू आहे हे नक्की.

LEAVE A REPLY

*