Thursday, May 2, 2024
Homeनगरवाईन विक्री न करण्याचे दुकानदारांना आवाहन

वाईन विक्री न करण्याचे दुकानदारांना आवाहन

अकोले |प्रतिनिधी| Akole

सरकारने जरी सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्याची परवानगी दिली तरी अकोल्यातील सुपर मार्केट चालकांनी आपल्या दुकानात वाईन विक्री करू नये, अशी विनंती दारूबंदी आंदोलन व वारकरी संघाच्या वतीने अकोल्यातील सर्व सुपर मार्केट चालकांना निवेदन देऊन करण्यात आली.

- Advertisement -

या निवेदनाला सर्व सुपर मार्केटचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत वाईन विक्रीला ठेवणार नसल्याचे जाहीर करत लवकरच व्यापारी असोसिएशन याबाबत एकत्र येऊन निर्णय घेईल असे सांगितले.

सुपर मार्केटबाहेर सुरुवातीला जनतेसमोर या वाईन विक्रीला विरोध का? ही भूमिका मांडण्यात आली. हेरंब कुलकर्णी यांनी बदनाम असलेल्या दारूला किराणा दुकानात आणून समाजमान्यता देण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगून वाईन म्हणजे दारू नाही असे सरकार सांगत असेल तर वाईन विक्रीला उत्पादनशुल्क विभागाचा परवाना मग कशासाठी लागतो? असा प्रश्न विचारला. आज सुपरमार्केट मध्ये सरकार समाजातील विरोधाचा अंदाज घेत आहे व पुढे तीच दारू ते किराणा दुकानापर्यंत नेतील त्यामुळे आजच विरोध करण्याची गरज आहे.

दीपक महाराज देशमुख यांनी समाजातील तरुण मुलांना व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय असल्याने वारकरी संप्रदायाचा व अगस्ती देवस्थानाचा या निर्णयाला विरोध आहे, सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास वारकरी व कीर्तनकार आंदोलन करतील अशी भूमिका मांडली. आम्ही प्रबोधन करायचे आणि सरकारने समाज व्यसनी करायचा असे सुरू असल्याची खंत व्यक्त केली.

दारूबंदी आंदोलनाचे अध्यक्ष संतोष मुतडक यांनी समाजाला दारू पाजून तिजोरीचे उत्पन्न वाढवण्याची सरकारची नीती समाजाच्या हिताला घातक आहे याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.

ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे यांच्या हस्ते सुपर मार्केट चालकांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी वारकरी संघटनेचे राजेंद्र महाराज नवले, भाऊसाहेब वाकचौरे, श्रीरंग भाटे, सुभान शेख, सुनील शेळके, संतोष मुतडक, दीपक महाराज देशमुख व हेरंब कुलकर्णी उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने डी के सुपर मार्केट, धनंजय सुपर मार्केट, अर्बन किराणा शॉपी, गणराज सुपर मार्केट व इतर सुपर मार्केट येथे चालकांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली. त्यावेळी सुपर मार्केट चालकांनी बोलताना, दुकानात महिला व मुले मोठ्या संख्येने येतात अशा ठिकाणी दारू विकणे हे अतिशय चुकीचे होईल, त्यामुळे आम्हालाही हा निर्णय आवडला नाही. अगस्ति देवस्थानचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी देवस्थानचा वाईन विक्रीला विरोध असून अकोल्यात वाईन विक्री करण्यास सर्व दुकानदार यांनी जाहीर विरोध करावा अशी विनंती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या