मालेगावात मुलींसाठी नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करणार : वायुनंदन; कामगारांना कौशल्याधारीत शिक्षण देण्यासाठी मुक्त विद्यापीठाचा पुढाकार

0

सातपूूर । महाराष्ट्रात यंत्रमाग क्षेत्रात आघाडीच्या मालेगाव परिसरात हजारो यंत्रमाग कामगार असून त्यांच्याशी निगडीत घरगुती महिला कामगार, रिक्षाचालक, गॅरेजमधील कामगारांना मुक्त विद्यापीठातर्फे कौशल्याधारीत शिक्षण दिले जाणार आहे. तसेच मुलींसाठी शहरात नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार असून मराठी सोबतच उर्दू भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

मालेगाव शहरातील एटीटी विद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण मालक, जॉबर, मुकादम संघटनेतर्फे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरू वायुनंदन बोलत होते. अध्यक्षस्थानी एटीटी शिक्षण संस्थेचे संचालक जमील अहमद होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते शामकांत पाटील, मा. कृ. जोशी, दीपक चव्हाण, दीपक वाल्हे, विद्यापीठाचे आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम, जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे, प्राचार्या मनोरमा कांबळे आदी उपस्थित होते.

कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन म्हणाले, मालेगावात काम करणार्‍या कामगारांकडे बहुविध कौशल्ये आहेत. मालेगावप्रमाणेच भिवंडी, मुंब्रा, अमरावती, कामठी आणि इचलकरंजीमध्येही कामगार आहेत. या कारागिरांची शैक्षणिक पात्रता कमी असून बहुतेकांनी शालांत परीक्षाही उत्तीर्ण केलेली नाही. मात्र पिढ्यान्पिढ्या काम केल्यामुळे त्यांच्याकडे कौशल्य विकसित झालेली आहेत. विद्यापीठाचे दिवंगत कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या प्रयत्नातून अशा कुशल 1300 कामगारांचे मूल्यमापन करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. मुक्त विद्यापीठाने समाजातील अशा वंचितांच्या कौशल्यांची नोंद घेऊन त्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाणार असल्याचे सांगितले.

डॉ. आर. कृष्णकुमार यांनी सुरू केलेला हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. यंत्रमाग कामगारांबरोबरच महिला कामगार, रिक्षाचालक, गॅरेजमधील कामगारांना लवकरच कौशल्याधारीत शिक्षण देण्यासाठी मुक्त विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. या ग्रामीण भागातील मुलींसाठी शहरात नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुकूल आहे. विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी यावेळी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, येथील कामगारांच्या श्रमाची दखल मुक्त विद्यापीठाने घेतल्याबद्दल जमील अहमद यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचे कौतुक केले. प्राचार्या मनोरमा कांबळे, पिंकी मेहता, संगीता कुलकर्णी, कविता कासलीवाल आदींनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्यात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांचा मालेगाव शहरातील विविध कामगार संघटना, संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी कामगार संघटनेचे अध्यक्ष अतिक शेख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जावेद अहमद यांनी केले, तर मुजम्मील मुकादम यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील कामगार व महिला व संघटनांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*