Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमे अखेर पुण्यात करोनाबाधित रुग्णाची संख्या होणार 10 हजार?

मे अखेर पुण्यात करोनाबाधित रुग्णाची संख्या होणार 10 हजार?

सार्वमत

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा अंदाज
पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पुणेकरांची चिंता वाढवणारा ठरला आहे. दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करोनाबाधितांची संख्या ही 10 हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, शहरात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील प्रतिबंधित भागातील नागरिकांनी दुसर्‍या ठिकाणी जाऊ नये, कोणी बाहेरचा येऊ नये म्हणून आता काही भागात पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बांबू लावूनही लोक मोठ्या प्रमाणात ये-जा करता. त्यामुळे लॉकडाऊन फक्त नावापुरते राहत असल्याने शहरातील गणेश पेठ या भागात चार ते पाच फुटाचे पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पुणे शहरात भवानी पेठ, कसबा पेठ, घोले रस्ता, येरवडा या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून या भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक खरेदीसाठी या भागातून त्या भागात जातात. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ज्या त्या भागातच मिळाव्या म्हणून आजपासून पेठांमधील काही भागात पत्रे लावून सील करण्यात आले आहे.शहरातील प्रतिबंधित भागातील अनेक ठिकाणी कमी जागेतील छोट्या-छोट्या घरात जास्त व्यक्ती असलेल्या कुटुंबाची अवस्था अर्थातच खूप वाईट आहे. घरात राहूनही त्यांना शारीरिक अंतर पाळता येणे मुश्कील होत आहे.

पुण्यात गेल्या सात दिवसात सलग पन्नासपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, करोनाबाधितांची संख्या सरासरी शंभरने वाढत आहे. आज ( 9 मे) सकाळपर्यंत पुण्यात एकूण 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात करोनाचा मृत्यूदर हा सरासरी 5.5 टक्के इतका आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करोनाबाधितांची संख्या ही जवळपास 10 हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

अंत्यसंस्काराला विरोध करणार्‍यांवर गुन्हा दाखल करणार
करोना रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत असताना काही भागात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिक विरोध करत आहेत. त्यामुळे करोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी औंध, बोपोडी, कात्रज, मुंढवा या स्मशानभूमीतील विद्युत आणि गॅस दाहिनी राखीव ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांना पीपीई किट देखील देण्यात आल्या आहेत. अंत्यसंस्काराला विरोध करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या